ऑनलाइन लोकमत
ओस्लो, दि. 17 - पाकिस्तानी खेळाडू उमर अकमल एक चांगला खेळाडू आहे यामध्ये काही वाद नाही. पण एक समस्या त्याला वारंवार सतावत असते तो म्हणजे परफॉर्मन्स. सातत्यपुर्ण कामगिरी करत नसल्याने अनेकदा त्याला टिकेला सामोरं जावं लागलं आहे. पण आता तर सर्वांनाच तो यापुढे खेळू शकतो नाही असा विचार करायला भाग पाडणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एरव्ही मोठमोठ्या गोलंदाजांविरोधात तुफान फटकेबाजी करणारा उमर अकमल एका नवख्या महिला गोलंदाजाच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. 
 
 
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यापासून पाकिस्तानी क्रिकेट संघ चांगलाच चर्चेत आहे. भारतीय संघाचा पराभव करुन चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली असल्याने त्यांचा आनंदही गगनाला भिडला आहे. पुढील काही दिवसांमध्ये महत्वाच्या मालिका होणार असून पाकिस्तानी खेळाडू सध्या जास्तीत जास्त आराम घेण्यावर भर देत आहेत. 
 
उमर अकमलदेखील नॉर्वेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून पाकिस्तानी समुदायाकडून आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. 
 
अशाच एका चॅरिटी क्रिकेट सामन्याचं आयोजनही करण्यात आलं होतं, ज्यासाठी उमर अकमल प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. दोन महिला क्रिकेट संघांमध्ये हा सामना होणार होता. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खेळाडू आपल्यासोबत खेळणार असल्याने सर्व क्रिकेटर्स उत्साही होते. पण इस्मा अहमदला हा सामना आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण य़ेऊन येईल याची कल्पन नसावी. कारण इस्माने टाकलेल्या चेंडूवर उमर अकमल क्लिन बोल्ड झाला. 
 

इस्मा लेग स्पिनर असून तिने टाकलेला बॉल उमर अकमल डावीकडे खेळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र बॉल बॅटला लागून स्टम्पवर लागला आणि अकमल क्लीन बोल्ड झाला. या एका चेंडूने इस्माला सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं असून व्हिडीओही व्हायरल होत आहे. 
 
उमर अकमलच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद आहे. आतापर्यंत उमर अकमल टी-20 करिअरमध्ये 24 वेळेस शून्यावर बाद झाला असून  त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शल गिब्जला मागे टाकलं आहे. गिब्ज 167 डावांमध्ये 23 वेळेस शून्यावर आऊट झाला होता. त्याच्या खालोखाल  श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आणि वेस्ट इंडिजच्या ड्वेन स्मिथचा नंबर लागतो. दिलशान 217 डावांमध्ये 23 वेळेस तर स्मिथ 270 डावांमध्ये 23 वेळेस शून्यावर बाद झाले आहेत.