ठाणे पोलिसांची मॅरेथॉन काशिनाथ दुधवडे यांनी जिंकली! महिलांच्या गटात शोभा देसाई अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 09:06 PM2017-11-19T21:06:59+5:302017-11-19T21:27:03+5:30

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे कमिशनर मॅरेथॉन’ स्पर्धेत शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आपली मोहोर उमटवली.

Thane police marathon Kashinath Dudhwade won! Shobha Desai tops in women's category | ठाणे पोलिसांची मॅरेथॉन काशिनाथ दुधवडे यांनी जिंकली! महिलांच्या गटात शोभा देसाई अव्वल

ठाणे पोलिसांची मॅरेथॉन काशिनाथ दुधवडे यांनी जिंकली! महिलांच्या गटात शोभा देसाई अव्वल

googlenewsNext

 ठाणे - ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे कमिशनर मॅरेथॉन’ स्पर्धेत शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आपली मोहोर उमटवली. अर्ध मॅरेथॉनची पहिली तिन्ही बक्षिसे या दलाने पटकावली. काशिनाथ दुधवडे या पोलीस कॉन्स्टेबलने एक तास ३३ मिनिटे आणि ५१ सेकंदांमध्ये २१ किलोमीटरचे अंतर पार करून ही स्पर्धा जिंकली. कल्याण अतिक्रमणविरोधी पथकाच्या शोभा देसाई या कॉन्स्टेबलने एक तास ४४ मिनिटांमध्ये महिलांच्या गटात अव्वल क्रमांक पटकावला.
आठ वेगवेगळ्या गटांमध्ये पार पडलेल्या सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रविवारी पहाटे ५ ते सकाळी ७.३० दरम्यान ठाण्याच्या रेमण्ड कंपनीसमोर पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अभिनेता सुनील शेट्टी आणि ऋतिक रोशन यांच्या हस्ते झाले. पुरुषांच्या अर्ध-मॅरेथॉनमध्ये योगेश डहाळे (शीघ्र कृती दल, ठाणे शहर) याने एक तास ३६ मिनिटे ५८ सेकंदांत उपविजेतेपद मिळवले. अक्षय गोसावी याने तिसरा क्रमांक मिळवला. महिला गटात एक तास ५१ मिनिटे ३० सेकंदांत २१ किलोमीटरचे अंतर पार करून पोलीसकन्या गीता राठोड उपविजेती ठरली. सारिका मोजड या मुख्यालयाच्या पोलीस कॉन्स्टेबलने तिसरा क्रमांक पटकावला.
कोणी जिंकणे किंवा हरण्यापेक्षाही स्पर्धा संपूर्ण पार करणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगत अमृता फडणवीस यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे स्पर्धा आयोजित करणाºया ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे त्याने विशेष आभार मानले. अशा स्पर्धांमधून आपली एक वेगळी ओळखही निर्माण होते, असे सांगून सर्व स्पर्धकांना त्यांनी प्रोत्साहित केले.
पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मुलांनी सहभाग नोंदवलेल्या या पुरुषांच्या २१ किलोमीटरच्या हौशी मॅरेथॉनमध्ये मुख्यालयाच्या दशरथ मेंगळ याने (एक तास २६ मिनिटे ३७ सेकंद) प्रथम, विनोद बिंद (एक तास ३४ मिनिटे २९ सेकंद, मुख्यालय) द्वितीय तर प्रकाश घोडके (एक तास ३४ मिनिटे ५७ सेकंद, शीघ्र कृती दल) या कॉन्स्टेबलने तृतीय क्रमांक पटकावला.
महिलांच्या गटात ही मॅरेथॉन पूर्ण करणाºया स्रेहल कर्नाळे या एकमेव विजेत्या ठरल्या. इतर स्पर्धक मात्र ही स्पर्धा पूर्ण करू शकल्या नाहीत.

उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे :
 
पुरुषांच्या १० किलोमीटरच्या स्पर्धेत विजय कुºहाडे (पोलीस कॉन्स्टेबल, कल्याण), शंकर रणदिवे (पोलीसपुत्र), तर अमित पवार (पोलीस कॉन्स्टेबल, नौपाडा) हे विजेते ठरले. महिला गटामध्ये संजना लहानगे, ऊर्मिला पवार आणि छाया सोनाळे या तिन्ही मुख्यालयाच्या स्पर्धकांनी बाजी मारली.
 
१४ वर्षे वयोगटातील ५ किलोमीटरच्या मुलांच्या स्पर्धेत धीरज तायडे, समर्थ गणेशकर आणि ओंकार आव्हाड, तर मुलींच्या गटात गायत्री शिंदे, संस्कृती देसाई आणि सिद्धी राऊत यांनी स्पर्धा जिंकली.
१४ ते ५० वयोगट (५ किमी) मध्ये मोहन भिरे, मधुकर पाटील आणि दिनकर देसाई, तर महिलांमध्ये ऐश्वर्या बनसोडे, पूनम जाधव आणि शहनाज मुजावर या पोलिसांच्या मुलांनी बक्षिसे पटकावली.
 
५० पेक्षा अधिक वयोगटातील ५ किमीची स्पर्धा वाल्मीक पाटील, सुरेश चव्हाणके आणि विजय हिरवे, तर महिलांच्या गटात पूर्णिमा नवीन, दीपाली पाटील आणि कल्पना मुगले यांनी जिंकली.
 
अमृता फडणवीस, पोलीस आयुक्त थिरकले झिंगाटच्या तालावर 
स्पर्धेच्या समारोपाला मुख्यमंत्र्यांच्या ‘होममिनिस्टर’ अमृता फडणवीस, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आदी दिग्गज मंडळींनी झिंगाटच्या गाण्यावर ताल धरला. तेव्हा त्यांना उपस्थित स्पर्धक आणि प्रेक्षकांनीही चांगलीच साथ दिली.
 
आरोग्य आणि जेवणाकडे लक्ष द्यावे - परमवीर सिंग
पोलिसांनी चांगले आरोग्य ठेवण्यासाठी जेवण आणि व्यायामाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आहारात साखरेचा प्रमाणशील वापर झाला पाहिजे. मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमधून आरोग्य सुदृढ राहते, असे परमवीर सिंग या वेळी म्हणाले.
 
अर्जुनासारखे ध्येय ठेवा : हिरानंदानी
चांगले काम किंवा ध्येय गाठताना अर्जुनासारखे ध्येय ठेवा. यश नक्कीच लाभेल, असा सल्ला या वेळी निरंजन हिरानंदानी यांनी दिला.

Web Title: Thane police marathon Kashinath Dudhwade won! Shobha Desai tops in women's category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.