आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेली संघ निवड चुकीची, आयर्न मॅन कौस्तुभ राडकरची खंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 06:01 PM2019-01-13T18:01:28+5:302019-01-13T18:02:35+5:30

आयर्न मॅनचा किताब पटकाविणारा पहिला भारतीय असलेला पुणे येथील डॉ.कौस्तुभ राडकर सध्या गोव्यातील ‘ट्रायथलॉन ११३’ या स्पर्धेसाठी ‘रेस डायरेक्टर’च्या भूमिकेत आहे.

The team selection for the Asian Games is wrong, say Iron Man Kaustubh Radankar | आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेली संघ निवड चुकीची, आयर्न मॅन कौस्तुभ राडकरची खंत 

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेली संघ निवड चुकीची, आयर्न मॅन कौस्तुभ राडकरची खंत 

Next

- सचिन कोरडे
आयर्न मॅनचा किताब पटकाविणारा पहिला भारतीय असलेला पुणे येथील डॉ.कौस्तुभ राडकर सध्या गोव्यातील ‘ट्रायथलॉन ११३’ या स्पर्धेसाठी ‘रेस डायरेक्टर’च्या भूमिकेत आहे. २२ आयर्न मॅन पूर्ण करणारा कौस्तुभ हा एकमेव भारतीय आहेत. ३.८ किमी पोहोणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे असे ‘आयर्न मॅन’साठी आव्हान असते. हे आव्हान कौस्तुभ याने २२ वेळा पूर्ण केले आहे. कौस्तुभ याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यात त्याने भारतातील ट्रायथलॉनची सद्यस्थिती यावरही भाष्य केले. 

गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा जो ट्रायथलॉन संघ निवडण्यात आला होता. त्यात ट्रायथलिट्स नव्हतेच. भारतीय संघाची झालेली निवड ही चुकीची होती. अशा संघाकडून तुम्ही पदकाची आशा करू शकत नाही. ट्रायथलॉन संघटनेने संघ निवड करताना गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असा जबर प्रहार कौस्तुभ राडकरने केला. ‘ट्रायथलॉन ११३’ या स्पर्धेच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या आयर्न मॅन डॉ. कौस्तुभ राडकर याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. या वेळी त्याने एका प्रश्नावर हे उत्तर दिले. 

कौस्तुभ म्हणाला की, या खेळात देशाला पदक मिळवायचे असेल तर पात्र खेळाडूंना संधी मिळायला हवी. नाहीतर ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळविण्यात भारताला खूप मोठा पल्ला गाठावा लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात ट्रायथलिट नव्हताच. जोपर्यंत अशी परिस्थिती सुधारत नाही. पदकाची आशा करता येणार नाही. भारतीय सेनेत चांगले ट्रायथलिट आहेत. ते चांगले टायमिंग देत आहेत. त्यांना योग्य दिशा मिळाली तर भारत ऑलिम्पिकमध्येही पात्रता मिळवेल. 

गोव्यात पहिल्यांदाच ११३ ट्रायथलॉन स्पर्धा होत आहे. १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमीचे अर्धमॅरेथॉन खेळाडूंना पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी सर्वाधिक १० तासांचा वेळ असेल. आयर्न मॅननुसार तीसाडेआठ तासांत पूर्ण करावी लागते. परंतु, भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही हा वेळ वाढवला आहे. स्पर्धेत १५० खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतात पहिल्यांदाच खुल्या समुद्रात स्पर्धा होत आहे. काही विदेशी ट्रायथलिट्सचाही समावेश आहे, असे त्याने सांगितले. 
 

२५ आयर्न मॅन किताबांचे लक्ष्य...
२००८ मध्ये एक चॅलेंज स्वीकारावे म्हणून आयर्न मॅन स्पर्धेत उतरलो होतो. अरिझोना येथे मी पहिली शर्यत पूर्णही करून दाखविली. यामध्ये ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग, ४२.२ किमी धावणे याचा समावेश होता. हा पहिला आयर्न मॅन किताब मिळविल्यानंतर मी पाच आयर्न मॅन पूर्ण केले आणि त्यानंतर ती संख्या २० वर पोहोचली. २०१७ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय होतो. आता हा प्रवास २५ आयर्न मॅन किताबांवर थांबवायचा आहे. त्यामुळे सध्या तरी माझ्यापुढे हेच लक्ष आहे.

शिष्यांकडून अपेक्षा...
माझ्या मार्गदर्शनाखाली १०० ट्रायथलिट्सनी कमीत कमी २० आयर्न मॅन पूर्ण करावेत, अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत ७०-७२ शिष्यांनी ही कामगिरी केलेली आहे. आयर्न मॅननंतर अल्टामॅन नावाची शर्यत असते. ही स्पर्धा तीन दिवसांची असते. ही खूप आव्हानात्मक असते. यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. यामध्ये पहिल्या दिवशी दहा किमी पोहणे, १४५ किमी सायकलिंग आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा २७१ किमी सायकलिंग करावे लागते. शेवटी ८४ किमी धावण्याची शर्यत असते. प्रत्येकी दिवशी १२-१२ तासांचा कट ऑफ असतो. 

ट्रायथलॉनचे भविष्य...
आपण या खेळात अजून अ‍ॅमॅच्युअर पातळीवर आहोत. सध्या विदेशात २ हजार टायथलिट्स असतात. विश्व चॅम्पियनशिपसाठी जाणाऱ्यांची संख्याही कमी आहे. तो टप्पा अजून गाठायला आहे. ती ६००-८०० पर्यंत जायला हवी. तरच इतरांना प्रेरणा मिळेल. ट्रायथलिट्सला लागणाऱ्या सर्व गोष्टींवर मला काम करावे लागेल. मी याआधी, दिल्ली येथे ही जबाबदारी सांभाळली आहे. 

ट्रायथलिट सराव...
कोल्हापूर येथे स्पर्धा झाली होती. गोव्यात समुद्राचा फायदा होईल. या स्पर्धेसाठी खेळाडूंनी खास तयारी केली आहे. स्ट्रेन्थ ट्रेनिंगची खास गरज असते. न्यूट्रिशियन्सवर खास लक्ष द्यावे लागते. 

फिटनेस फंडा...
ट्रायथलिट किंवा सर्वांसाठी फिटनेस गरजेचा आहे. पण, यासाठी विशेष तयारी करण्याची गरज आहे. फिटनेस हा तुमच्या लाइफस्टाइलमध्ये पाहिजे. जसं आपण जेवतो तसा व्यायामही गरजेचा आहे. दिवसातून अर्धा तास तरी तुम्ही काढायलाच हवा. आहारात सर्वंच गोष्टींची आवश्यकता असतो. त्यामुळे हेच खावे-तेच खावे असे अधिक नियम लावणेही योग्य नाही. सर्वात महत्त्वाचा व्यायाम आहे. त्यासाठी तुम्ही वेळ काढा. मला ‘डाएट’ हा विशेष शब्द आवडत नाही. भारतीय आहार हा जगात सर्वाेत्कृष्ट आहे. आपल्याकडे ताजं जेवण मिळतं. फक्त आहारातील तिखट, तेलकट आणि गोड फार कमी हवं. सॅलेड, दही, भात, पोळी हे परफेक्ट आहे. आधुनिक खाद्यं मात्र टाळावीत. 

महाराष्ट्र आघाडीवर...
ट्रायथलॉन या खेळात सध्या महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधून चांगले ट्रायथलिट पुढे येत आहेत. कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. कोल्हापूरमधून १७-१८ ट्रायथलिट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यानंतर दिल्ली आणि बंगळुरू येथे चांगले ट्रायथलिट आहेत. 

Web Title: The team selection for the Asian Games is wrong, say Iron Man Kaustubh Radankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा