राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : जे. जे.हॉस्पिटल, देना बँक संघ बाद फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 03:29 PM2019-02-21T15:29:38+5:302019-02-21T15:30:03+5:30

मुंबई : जे.हॉस्पिटल आणि देना बँक संघांनी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या "स्व.मोहन नाईक चषक" ...

State level Kabaddi competition: J. J. Hospital, Dena Bank team in the next round | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : जे. जे.हॉस्पिटल, देना बँक संघ बाद फेरीत

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : जे. जे.हॉस्पिटल, देना बँक संघ बाद फेरीत

मुंबई : जे.हॉस्पिटल आणि देना बँक संघांनी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या "स्व.मोहन नाईक चषक" राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. महिला गटात शिवशक्ती, महात्मा गांधी, अनिकेत यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित. पुरुषांच्या ड गटात जे जे हॉस्पीटल व देना बँक यांनी दोन विजय मिळवीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. या गटात आग्रक्रम मिळविण्यासाठी या दोन संघात लढत होईल. शिंदेवाडी-दादर(पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर सुरू असलेल्या या सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी जेष्ठ क्रीडा पत्रकार शिवराम सोनावडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

जे जे हॉस्पीटलने दोन विजय मिळवताना प्रथम महा बँकेला ४४-२२असे, तर नंतर ठाणे पोलीस संघाला ३५-१२असे नमविले. मयूर शिवतरकर, मयूर शेट्ये, प्रमोद धुत, बालाजी जाधव यांचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. याच गटात देना बँकेने आज ठाणे पोलिसांवर ५२-२३अशी मात करीत दुसऱ्या विजयाची नोंद केली. मध्यांतराला २लोण देत २९-१५अशी आघाडी घेणाऱ्या बँकेने उत्तरार्धात आणखी जोशपूर्ण खेळ करीत हा विजय मोठ्या फरकाने मिळवला. नितीन देशमुख, सागर सुर्वे या विजयाचे शिल्पकार ठरले. पोलिसांचा नामदेव इस्वालकर एकाकी लढला. ब गटात सेंट्रल बँकेने मध्यांतरातील १०-१४अशा ४गुणांच्या पिछाडीवरून मध्य रेल्वे विभागाचा ३९-३५असा पाडाव केला.या दुसऱ्या पराभवामुळे रेल्वेचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. या गटातून महिंद्रा व बॅँक बाद फेरीत दाखल होतील. धनंजय सरोज, अभिजित गुडे, ओमकार मोरे, ओमकार सोनावणे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे बँकेने हा विजय साकारला.

अ गटात बँक ऑफ इंडियाने न्यू इंडियाचा २८-२२असा पराभव करीत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.मध्यांतराला १६-१० अशी आघाडी घेणाऱ्या बँकेला उत्तरार्धात न्यू इंडियाने कडवी लढत दिली. बँकेकडून सुशील भोसले,निशांत मोरे, तर न्यू इंडियाकडून अभिषेक रामाणे, निलेश पवार उत्कृष्ट खेळले. क गटात रायगड पोलीसने मुंबई बंदरला ३०-२७असे चकवित या गटात आगेकूच केली. मध्यांतराला १५-११अशी आघाडी पोलिसांकडे होती. उत्तरार्धात सामन्यात बऱ्यापैकी चुरस पहावयास मिळाली. राजू पाटील, राजेंद्र म्हात्रे, दीपक कासारे बँकेकडून छान खेळले.

महिलांच्या क गटात पुण्याच्या शिवओमला संमिश्र यश मिळाले. पहिल्या सामन्यात शिवओमने पालघरच्या श्रीरामाला ३९-१२असे पराभूत केले, पण नंतर ठाण्याच्या शिवतेजने शिवओमला ३४-२८ असे नमविलें. अ गटात पुण्याच्या जागृतीने होतकरूला ४३-२३असे पराभूत केले. ऋतुजा होसमाने, अंजली मुळे यांचा खेळ या विजयात उठून दिसला. होतकरूची मेघा माईन बरी खेळली. या गटात शिवशक्तीने होतकरूचा ५०-१२ असा फडशा पाडला. या सलग दोन पराभवामुळे होतकरूला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. ऋतुजा बांदिवडेकर, ज्योती डफळे, सोनम भिलारे या विजयात चमकल्या. ब गटात महात्मा गांधींने सायली जाधव, तृप्ती सोनावणे, ग्रंथाली हांडे यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर स्वराज्यावर ४७-१९अशी मात केली. स्वराज्यची अंजली रोकडे बरी खेळली.

Web Title: State level Kabaddi competition: J. J. Hospital, Dena Bank team in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.