राज्यस्तरीय कबड्डी : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 05:53 PM2019-02-23T17:53:53+5:302019-02-23T17:54:12+5:30

या महिन्यातील एअर इंडियाचे तिसरे, तर शिवशक्तीचे हंगामातील पाचवे जेतेपद; सुशांत साईल, सायली जाधव सर्वोत्तम

State level Kabaddi: Air India, Shivshakti win title | राज्यस्तरीय कबड्डी : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद

राज्यस्तरीय कबड्डी : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद

googlenewsNext

मुंबई : एअर इंडिया, शिवशक्ती यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकाविले. एअर इंडियाचे या महिन्यातील हे तिसरे राज्यस्तरीय अजिंक्यपद, तर शिवशक्तीचे या हंगामातील हे पाचवे जेतेपद आहे. एअर इंडियाचा सुशांत साईल आणि महात्मा गांधींची सायली जाधव हे अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडू ठरले. 

शिंदेवाडी-दादर (पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर  झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने महिंद्राला ३५-१८अशी मात करत स्व.मोहन नाईक चषकावर नाव कोरले. एअर इंडियाने सुरवातच झोकात केली. त्यांच्या असलम इनामदारने आपल्या व संघाच्या पहिल्याच चढाईत बोनस करीत संघाला गुण मिळवून दिला. एअर इंडियाने २गुण घेतल्यानंतर महिंद्राच्या ऋतुराज कोरवीने असलमच्या पायात झेप घेत पहिला गुण घेतला.अनंत पाटीलच्या सलग ३पकडी करीत एअर इंडियाने महिंद्राचा एक टायर निकामी केला.तसेच १०मिनिटाला लोण देत एअर इंडियाने १२-०२अशी हवेत झेप घेली. लोण झाल्यानंतर अनंत पाटीलने एका चढाईत ३गडी टिपत महिंद्राचे इंजिन गरम करण्याचा प्रयत्न केला. पण तो क्षणिक ठरला.

मध्यंतराला २०-११अशी एअर इंडिया कडे आघाडी होती. मध्यांतरा नंतर १३व्या मिनिटाला एअर इंडियाने आणखी एक लोण देत ३१-१६अशी आघाडी घेत महिंद्राच्या सर्वच चाकातील हवा काढून घेतली.या लोण नंतर महिंद्राच्या इंजिनातील धडधड थंड झाली. या नंतर महिंद्राला एअर इंडियाचे हवेतील विमान जमिनीवर आणणे जमले नाही. एअर इंडियाच्या या विजयात असलम इनामदारने १२चढाया करीत १बोनस व ४गुण घेतले.सुशांत साईलने १२चढायात ४गुण घेतले,पण एकदा त्याची अव्वल पकड झाली. आदित्य शिंदेने ६पकडी यशस्वी केल्या. महिंद्राच्या अनंत पाटीलने १४चढायात ५गुण घेतले खरे,पण ५वेळा तो पकडला गेला.पाटीलने हे अपयश आणि बचावातील त्रुटी महिंद्राच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. 

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने महात्मा गांघीचा २६-१७ असा पाडाव केला. दोन्ही संघाचे काही नामवंत खेळाडू खेळत नसल्यामुळे सामना तसा संथपणे खेळला गेला.मध्यंतरापर्यंत सामन्याचा गुणफलक १६-१०असा शिवशक्तीच्या बाजूने झुकला होता. गुणातील हा फरक शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा शिवशक्तीकडे २०-१६अशी आघाडी होती. शेवटी ९गुणांनी शिवशक्तीने हंगामातील या ५व्या राज्यस्तरीय विजयाला गवसणी घातली. वैयक्तिक कामगिरी पेक्षा दोन्ही संघाची सांधिक कामगिरी या सामन्यात उठून दिसली. रक्षा नारकर,पूजा यादव, पौर्णिमा जेधे यांचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. महात्मा गांधी कडून सायली जाधव, सृष्टी चाळके, तृप्ती सोनावणे यांना अखेर पर्यंत आपला खेळ उंचावता आला नाही. सायलीने या सामन्यात अवघे २गुण घेतले.

देना बँकेचा नितीन देशमुख व महिंद्राचा अनंत पाटील यांना पुरुषांत अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. महिलांत शिवशक्तीच्याच पूजा यादव व पूर्णिमा जेधे या दोघी अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. 

Web Title: State level Kabaddi: Air India, Shivshakti win title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी