State of Adult Table Tennis: PYC two teams in semifinals; Solapur 'A', Santacruz Gymkhana also in the last four | प्रौढांची राज्य टेबल टेनिस : पीवायसीचे दोन संघ उपांत्य फेरीत; सोलापूर ‘अ’, सांताक्रूझ जिमखानादेखील अंतिम चारमध्ये

पुणे : डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती चषक प्रौढ गट राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी सांघिक गटातून शनिवारी उपांत्य फेरी गाठली.
पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखान्याच्या टेबल टेनिस सेंटरमध्ये सुरू आहे. उपांत्यपूर्व फेरीत पीवायसी ‘अ’ने गोमांंतक ‘अ’चे अव्हान ३-०ने संपवले. उपेंद्र मुळ्ये आणि रोहित चौधरी यांनी एकेरी तसेच दुहेरी प्रकारात आपापल्या लढती जिंकून गोमांतक संघावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. विवेक आळवणी आणि सुनील बाबरस यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पीवायसीच्या ‘ब’ संघाने सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’चा ३-०ने धुव्वा उडवून उपांत्य फेरीत धडक दिली. सोलापूर ‘अ’ विरू द्ध पीवायसी ‘क’ संघ ०-३ने सहजपणे पराभूत झाला. नितीन तोष्णीवाल आणि मनीष आर. सोलापूरच्या विजयाचे शिल्पकार ठरले. सांताक्रूझ जिमखान्याने पीजे हिंदू जिमखान्यावर ३-१ने सरशी साधली.
पुणे जिल्हा टेबल टनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस आणि डॉ. विद्या मुळ्ये यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. या वेळी पीवायसी हिंदू जिमखान्याचे खजिनदार आनंद परांजपे, गौरी आपटे, सुभाष लोढा, दीपक हळदणकर, अविनाश जोशी, कपिल खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सांघिक निकाल :
उपांत्यपूर्व फेरी
पीवायसी हिंदू जिमखाना ‘अ’ विवि गोमंतक ‘अ’ : ३-० (उपेंद्र मुळ्ये विवि अजय कोठावळे ११-९, ११-७, ११-६. रोहित चौधरी विवि समीर भाटे ११-७, ११-८, ११-५. उपेंद्र मुळ्ये- रोहित चौधरी विवि समीर भाटे-श्रीराम ११-८, ११-४, ११-६).
सोलापूर ‘अ’ विवि पीवायसी हिंदू जिमखाना ‘क’ :
३-० (नितीन तोष्णीवाल विवि सचिन धारवातकर १-११, ११-८, ११-५, ११-७. मनीष आर. विवि दीपेश अभ्यंकर ११-६, ११-१३, ११-६, १४-१२. मनीष आर.-नितीन तोष्णीवाल विवि सचिन धारवातकर-दीपेश अभ्यंकर ११-९, ११-८, ८-११, ११-८.
पीवायसी हिंदू जिमखाना ‘ब’ विवि सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ ३-० (विवेक आळवणी विवि नितीन मेहेंदळे १३-११, ११-४, ११-७. सुनील बाबरस विवि केदार मोघे ११-७, ११-६, ११-८. विवेक आळवणी-सुनील बाबरस विवि नितीन मेहेंदळे-केदार मोघे ११-४, ११-५, ११-८).
सांताक्रूझ जिमखाना विवि पीजे हिंदू जिमखाना : ३-१ (राजेश सिंग विवि प्रकाश केळकर ११-७, १२-१०, ११-४. किरण सालियन विवि अभय मेहता ११-७, ११-९, ११-७. राजेश सिंग -किरण सालियन पराभूत वि. संजय मेहता-अभय मेहता ११-१३, १२-१४, १२-१४. किरण सालियन विवि प्रकाश केळकर ११-५, ११-९, ११-२).