Spin | फिरकीचा पेच

ब्रिस्बेन : अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघव्यवस्थापनाने लेग स्पिनर कर्ण शर्माला खेळविण्याचा घेतलेला निर्णय विशेष यशस्वी ठरला नाही. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कुठल्या फिरकीपटूला संधी द्यायची, असा पेच भारतीय संघव्यवस्थापनाला पडला आहे.
कर्ण शर्माला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ ३५ सामने खेळण्याचा अनुभव आहे, पण आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा पर्याय असताना कर्णला पहिल्या कसोटी सामन्यात प्राधान्य देण्यात आले.
कर्णने अ‍ॅडिलेड कसोटीत एकूण ४९ षटके गोलंदाजी केली. त्यात त्याने २३८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याच्या तुलनेत आॅस्ट्रेलियाचा आॅफ स्पिनर नॅथन लियोनने या सामन्यात ७०.१ षटके गोलंदाजी करताना २८६ धावांच्या मोबदल्यात १२ बळी घेतले. लियोनमुळे भारतीय संघव्यवस्थापनाला आपल्या व्यूहरचनेवर विचार करण्यास भाग पाडले. आॅफ स्पिनर अश्विन सध्याच्या संघातील सर्वांत अनुभवी फिरकीपटू आहे, पण इंग्लंड दौऱ्यानंतर आॅस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याला विशेष महत्त्व देण्यात आलेले नाही. अश्विनकडे इंग्लंड दौऱ्यात दुर्लक्ष करण्यात आले होते. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनला अंतिम संघात स्थान मिळेल, अशी आशा होती, पण संघव्यवस्थापनाने कर्ण शर्माला संधी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. कर्ण शर्मा चांगला गोलंदाज आहे, पण आॅस्ट्रेलियासारख्या महत्त्वाच्या दौऱ्यात भारताला अनुभवी फिरकी गोलंदाजाची गरज आहे. (वृत्तसंस्था)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.