अखेरच्या दिवशी आॅस्ट्रेलियन संघाचा डाव गुंडाळता न आल्यामुळे भारतीय संघ निराश झाला असेल, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केली. तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या निर्णायक कसोटीपूर्वी लय आमच्या संघासोबत असेल, असेही स्मिथ म्हणाला.
स्मिथ म्हणाला, ‘क्रिकेटमध्ये ‘लय’ या शब्दाला महत्त्व असेल, तर सध्या लय आमच्यासोबत आहे. भारताला आज आमचा डाव गुंडाळण्याची आशा होती. त्यामुळे ते नक्कीच निराश झाले असतील.’
पीटर हँड्स्कोबने नाबाद ७२, तर शॉन मार्शने ५३ धावांची खेळी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलिया संघाला लढत अनिर्णीत राखून दिली.
स्मिथ म्हणाला, ‘मला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे. त्यांनी योजनाबद्ध खेळ केला. आम्हाला सूर गवसला असून संघ धरमशाला येथे होणाऱ्या निर्णायक लढतीसाठी सज्ज आहे.’ (वृत्तसंस्था)