संजीवनीने जिंकले कांस्य, भारतीय महिला संघानेही पटकावले कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:37 AM2018-03-16T01:37:48+5:302018-03-16T01:37:48+5:30

महाराष्ट्राची सुकन्या आणि भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिने चीन येथे सुरु असलेल्या १४व्या आशियाई क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेच्या ८ किमी शर्यतीमध्ये कांस्य पदकाची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकविला.

Sanjeevani won bronze, Indian women's team won bronze | संजीवनीने जिंकले कांस्य, भारतीय महिला संघानेही पटकावले कांस्य

संजीवनीने जिंकले कांस्य, भारतीय महिला संघानेही पटकावले कांस्य

Next


गुइयांग : महाराष्ट्राची सुकन्या आणि भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिने चीन येथे सुरु असलेल्या १४व्या आशियाई क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेच्या ८ किमी शर्यतीमध्ये कांस्य पदकाची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकविला. विशेष म्हणजे याच शर्यतीच्या सांघिक गटातही भारतीय संघाने कांस्य पदकाची कमाई करत आपली छाप पाडली.
२० वर्षीय संजीवनीने २८ मिनिट १९ सेकंदाची वेळ देत शर्यत पूर्ण केली आणि कांस्य पदकावर नाव कोरले. चीनच्या ली डॅन हिने २८ मिनिट ३ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर कब्जा केला. तसेच, जपानच्या अ‍ॅबी युकारी हिने २८ मिनिट ६ सेकंदासह रौप्य पदक पटकावले.
याच शर्यतीमध्ये सांघिक गटात भारतीय संघाला कांस्य पदक जिंकण्यात यश आले. चार धावपटूंचा समावेश असलेल्या भारतीय संघामध्ये संजीवनीसह स्वाती गाढवे, जुम्मा खातून आणि ललिता बाबर यांचा सहभाग होता. प्रत्येक संघातील तीन धावटूंची वैयक्तिक शर्यतीतील सर्वोत्तम वेळ लक्षात घेऊन सांघिक पदक निश्चित करण्यात आले. यानुसार भारताने कांस्य पटकावले.
स्वातीने ३८ मिनिट १८ सेकंदाची वेळ देत ११वे स्थान पटकावले. तसेच, खातूनला ३२ मिनिट १४ सेकंदाच्या वेळेसह १४व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याचवेळी, भारताची स्टार धावपटू आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेजच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या ललिता बाबरला मात्र आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आली नाही.
ललिताने ३२ मिनिट ५३ सेकंदाची वेळ नोंदवली आणि यासह ती १५ धावपटूंचा सहभाग असलेल्या या शर्यतीत तळाच्या स्थानी राहिली. मात्र, संजीवनी जाधवच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारतीय संघाला पोडियम स्थान पटकावण्यात यश आले. (वृत्तसंस्था)
>पुरुषांचे पदक थोडक्यात हुकले
पुरुषांच्या १२ किमी क्रॉस कंट्री शर्यतीमध्ये भारतीय संघाचे पदक थोडक्यात हुकले. या शर्यतीमध्ये भारताला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.
जपानने एकहाती वर्चस्व राखत सुवर्ण पटकावले असून चीन व इराण यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरले.
भारतीय संघामध्ये शंकर क्षेत्री (९वा), प्रदीप चौधरी (११वा), अर्जुन कुमार (१४वा) आणि रती सैनी (१५वा) यांचा समावेश होता. पुरुषांच्या शर्यतीमध्ये एकूण २४ धावपटूंचा सहभाग होता.
>पुनरागमन अपयशी... लग्नानंतर तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या ललिता बाबरला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. आशियाई स्पर्धा माझे मुख्य लक्ष्य असून यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा माझा विचार असल्याचे मत काही दिवसांपूर्वी ललिताने व्यक्त केले होते. मात्र, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर आता तिला आणखी मेहनत घ्यावी लागेल.

Web Title: Sanjeevani won bronze, Indian women's team won bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.