पुण्याची ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला; स्पेशल ऑलिम्पिकमध्ये जिंकली 2 पदकं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:49 PM2019-03-23T16:49:51+5:302019-03-23T16:50:31+5:30

विशेष ऑलिम्पिकमध्ये पुण्याची ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला पटनायकने जलतरणात शानदार कामगिरी केली.

Pune 'Dolphin Girl' Camila won 2 medalsin the Special Olympics | पुण्याची ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला; स्पेशल ऑलिम्पिकमध्ये जिंकली 2 पदकं

पुण्याची ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला; स्पेशल ऑलिम्पिकमध्ये जिंकली 2 पदकं

googlenewsNext

पुणे : विशेष ऑलिम्पिकमध्ये पुण्याची ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला पटनायकने जलतरणात शानदार कामगिरी करीत भारताला २ पदके जिंकून दिली. १८ वर्षीय कॅमिला शुक्रवारी पुण्यात परतल्यावर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे नुकतीच १४ ते २१ तारखेदरम्यान ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत कॅमिलाने ८०० मीटर पूल स्विमिंग प्रकारात रौप्य तर, १५०० मीटर सागरी जलतरण प्रकारात कांस्यपदक जिंकले. याशिवाय विशेष ऑलिम्पिकच्या काळातच तेथे सुपर स्पोर्ट्स इंटरनॅशनल ही स्पर्धा झाली. यात सर्व वयोगटातील सामान्य तसेच विशेष खेळाडू सहभागी झाले होते. यातील सागरी जलतरण प्रकारात १५०० मीटरची शर्यतही कॅ मिलाने पूर्ण केली.

पिंपळे गुरव परिसरातील कल्पतरू सोसायटी या निवासस्थानी परतताच कॅ मिलाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिचे कौतुक केले. कॅमिलाचे वडील सूर्यनारायण, आई लीला आणि लहान बहिण भव्या तिच्यासोबत गेले होते. विशेष मुलांच्या वर्तनाचा अभ्यास असल्याने सूर्यनारायण आणि लीला या दाम्पत्याने विशेष ऑलिम्पिकमध्ये स्वयंसेवकाची भूमिका बजावली. या योदानासाठी विशेष सत्कार करण्यात आलेल्या निवडक लोकांमध्ये त्यांचा सहभाग होता. 

शिवाय ११ वर्षीय भव्याने सुपर स्पोर्ट्स इंटरनॅशनलमध्ये समुद्री जलतरणाच्या २०० मीटर शर्यतीत कांस्यपदक प्राप्त केले. पटनायक कुटुंबातील या सर्वांच्या यशाचे कल्पतरू सोसायटीतील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. ५२ वर्षीय सूर्यनारायण टाटा मोटर्समध्ये इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहेत. लीला या मुलींची संपूर्ण देखभाल करतात. 

वयाच्या १३ व्या वर्षापासून सराव
कॅमिलाने वयाच्या १३व्या वर्षापासून पोहण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून अभिजित तांबे यांच्याकडे ती सराव करीत आहे. पिंपरी येथील अण्णासोहब मगर स्टेडियममध्ये रोज ३ ते ४ तास सराव हा तिच्या यशाला कारणीभूत ठरला. २०१५ मध्ये कॅ मिलाने ५ किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत सामान्य खेळाडूंना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला होता. तेव्हा तिला तांबे यांनी ‘डॉल्फिन गर्ल’ म्हणून संबोधले होते. कॅमिलाची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापूर्वी २०१६ मध्ये इटलीतील स्पर्धेतील ती सहभागी झाली होती. शिवाय, राष्ट्रीय स्तरावर तिने ७ सुवर्णपदके जिंकली आहेत.

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गायचे होते...
कॅमिलाला गायनाची आवड आहे. तिला देशभक्तीपर गाणी जास्त आवडतात. त्यापैकी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे तिचे विशेष आवडते. हे गाणे स्पर्धेदरम्यान गायची तिची इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही. आगामी काळात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपले आवडते गाणे तेथे गाणार असल्याचे कॅमिलाने ‘लोकमत’ला सांगितले. स्पर्धेबाबत बोलताना ती म्हणाली, ‘‘आम्ही तेथे खूप मजा केली. अनेक नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या. पुन्हा ऑलिम्पिकमध्ये खेळायला मला आवडेल.’’

भीक मागणाऱ्या मुलांसाठी काम करण्याची इच्छा
रस्त्यांवर भीक मागणाऱ्या मुलांबाबत कॅमिलाला सहानुभूती आहे. अशी मुले दिसली की ती वडिलांना मागून त्यांना पैसे देते. या मुलांसाठी काम करायची तिची इच्छा असल्याने कॅमिलाच्या वडिलांनी सांगितले.

अनपेक्षित यश...
कॅमिला ही इतक्या मोठ्या स्पर्धेत २ पदके जिंकेल, याचा विचार आम्ही अजिबातही केला नव्हता. मात्र, प्रशिक्षक अभिजित तांबे यांचा तिच्या क्षमतेवर विश्वास होता. तिच्यात ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता आहे, असे ते कायम म्हणायचे. या यशाचे श्रेय त्यांना जाते.
- लीला पटनायक, कॅमिलाची आई

मुलीचा अभिमान
वडील म्हणून मुलीने जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशाचा मला खूप अभिमान वाटतो. तिच्या आनंदासाठी वाट्टेल ते करण्याची माझी तयारी आहे.
- सूर्यनारायण पटनायक, कॅमिलाचे वडील

Web Title: Pune 'Dolphin Girl' Camila won 2 medalsin the Special Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.