वृत्तपत्र विक्रेत्याचा 'सुवर्ण'पंच; बॉक्सर दीपकचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 07:05 PM2019-03-20T19:05:50+5:302019-03-20T19:11:32+5:30

भारताच्या दीपक भोरियानं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

Newspaper seller's Deepak Bhoria won gold in first International boxing event | वृत्तपत्र विक्रेत्याचा 'सुवर्ण'पंच; बॉक्सर दीपकचा प्रेरणादायी प्रवास

वृत्तपत्र विक्रेत्याचा 'सुवर्ण'पंच; बॉक्सर दीपकचा प्रेरणादायी प्रवास

Next

हरयाणा : भारताच्या दीपक भोरियानं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. एक काळ असा होता की हरयाणाच्या हिसार येथील या बॉक्सिंगपटूवर आर्थिक संकटामुळे वृत्तपत्र विकण्याची वेळ आली होती, परंतु त्याचा त्याने खेळावर परिणाम होऊ दिला नाही. या 21 वर्षीय खेळाडूनं मकरान चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या दीपकने 46-49 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जाफर नासेरीवर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचे ते एकमेव सुवर्णपदक ठरले. या स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह पाच रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली.

दीपकचा सुवर्णपदकापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याला डायटसाठी योग्य आहार मिळावा यासाठीही संघर्ष करावा लागला होता आणि त्याने जवळपास हार मानली होती. पण, जसजसं दिवस बदलत गेले त्यानं हिसारच्या बॉक्सिंग अकादमीत प्रवेश घेतला. तो म्हणाला,''2009 साली आर्थिक चणचण भासल्यामुळे मी बॉक्सिंग सोडलं होतं. तेव्हा प्रशिक्षकांनी मला साहाय्य केलं. त्यांनी सहा महिन्यात मला बॉक्सिंगमध्ये परत आणले. त्यांनी माझ्या बॉक्सिंग डायट आणि फी चा भार उचलला.'' 

त्याचा हा संघर्ष इथेच संपला नाही. 2011मध्ये त्याला मोठा धक्का बसला... त्याचा डावा हात फॅक्चर झाला. तो सांगतो,'' मी ठीक झालो याचा आनंद आहे. दुखापतीतून सावरत असताना मला डाव्या हातानं सराव करावा लागायचा आणि त्याचा मला फायदा झाला. आता मी दोन्ही हातानं एकाच ताकदीनं पंच लगावू शकतो.'' दीपकचे वडील इंडियन होम गार्डमध्ये आहेत आणि आई घर सांभाळते.

तो पुढे म्हणाला,'' 2012 हे वर्ष माझ्यासाठी विशेष राहिले. राज्यस्तरीय स्पर्धेत मी प्रथमच सुवर्ण जिंकले. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय संघटनेने भारतीय हौशी बॉक्सिंग संघटनेवर बंदीची कारवाई केली. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या नाहीत. दोन वर्ष कोणतीही मोठी स्पर्धा न झाल्याने आर्थिक परिस्थिती खालावली. बहीणीच्या अभ्यासाचा आणि माझ्या डायटचा खर्च परवडत नव्हता. त्यावेळी मी वृत्तपत्र विकण्याचे काम केले.''  

2015 मध्ये त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बंगळुरु येथे झालेल्या भारतीय सैन्याच्या चाचणीत त्याची निवड झाली. त्यानंतर पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूटकडून त्याला काही स्पर्धा खेळता आल्या. 2016मध्ये त्याची सैन्यदलाच्या संघात निवड झाली आणि त्यानं 2017 मध्ये आंतरसैन्यदल स्पर्धेत सुवर्ण जिंकले.

2017मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 49 किलो वजनी गटात खेळताना त्याच्या जबड्याला जबर मार लागला. त्यानंतर त्याला तीन महिने विश्रांती घ्यावी लागली. ''2018मध्ये सैन्याच्या स्पर्धेशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकले आणि याच कामगिरीच्या जोरावर मकरान चषक स्पर्धेत प्रवेश मिळवला. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. आता आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे.''  

Web Title: Newspaper seller's Deepak Bhoria won gold in first International boxing event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.