दुबई : भारताची स्टार फलंदाज मिताली राज आयसीसी मानांकनात दुसऱ्या स्थानावर कायम असली तरी ती अव्वल स्थानाच्या नजीक आहे. आॅस्ट्रेलियाची मेंग लेनिंग ही काही गुणांनी आघाडीवर आहे. मात्र, आयसीसी विश्वचषकातील प्रदर्शनाच्या जोरावर मितालीने बरेच अंतर कमी केले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध ‘करा व मरा’ अशा स्थितीतील सामन्यात शानदार शतक झळकावून तिने भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठून दिली होती. मितालीने स्पर्धेत आतापर्यंत ३५६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या भारतीय कर्णधार मितालीचे ७७४ गुण आहेत.
पहिल्या क्रमांकावरील लेनिंग हिच्या ती केवळ पाच गुणांनी पिछाडीवर आहे. गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामी हिला तीन तर एकता बिस्त हिला एका स्थानाने नुकसान झाले. या दोघी अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. टीम रॅँकिंगमध्ये आॅस्ट्रेलियाला एका गुणाने फायदा झाला असून ते १२८ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. इंग्लंड (१२४) दुसऱ्या, न्यूझीलंड (११८) तिसऱ्या तर भारतीय संघ (११३) चौथ्या क्रमांकावर आहे.