राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे - इर्शाद अहमद यांच्यात जेतेपदाचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 04:36 PM2019-02-23T16:36:10+5:302019-02-23T16:36:49+5:30

महिला एकेरीत उपांत्य फेरीत जैन इरिगेशनच्या आयेशा महम्मद अंतिम फेरीत

National Carrom Competition: Prashant More - Ershad Ahmed in final | राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे - इर्शाद अहमद यांच्यात जेतेपदाचा सामना

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे - इर्शाद अहमद यांच्यात जेतेपदाचा सामना

googlenewsNext

कुडाळ : ४७ व्या वरिष्ठ राष्रीय कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात विश्व विजेत्या प्रशांत मोरेने त्याचाच सहकारी झाहिर पाशाचा  २-२५, २२-१८, २३-९ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पुरुषांच्या उपांत्य सामन्यात विदर्भच्या इर्शाद अहमदने महाराष्ट्राच्या राजेश गोहीलवर चुरशीच्या लढतीत ९-२५, २३-१७, २५-५ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित व  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या यजमानपदाखाली कुडाळ, सिंधुदुर्ग येथे ही स्पर्धा सुरु आहे. 

महिला एकेरीत उपांत्य फेरीत जैन इरिगेशनच्या आयेशा महम्मदने सहकारी नीलम घोडकेला २५-१२, २५-५ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात रश्मी कुमारीने एस अपूर्वाला २२-५, ९-२०, २०-१० असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली. पुरुष वयस्कर एकेरी गटात उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या अस्लम चिकतेने  एम पी एस सी बी च्या इ मुरलीला २५-२२, २५-७ असे हरवून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये महाराष्ट्राच्या शब्बीर खानाने जैन इरिगेशनच्या मनू बारियाला  १८-१४, २५-१०  असे पराभूत केले. 
महिला वयस्कर उपांत्य लढतीमध्ये महाराष्ट्र्राच्या मालती केळकरने महाराष्ट्राच्या शोभा कामतला २१-१८, १७-१३  असे हरवून अंतिम फेरीत मजल मारली. दुसऱ्या उपांत्य लढाईत महाराष्ट्राच्या रोझिना गोदादने  नाबार्डच्या न्यांसी सीक्वेराचा २५-६, २१-५ असा पराभव केला. 

एअर इंडिया व पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाला सांघिक विजेतेपद 
आंतर संस्था सांघिक पुरुष गटामध्ये एअर इंडियाने बाजी मारली. रिझर्व्ह बँकेच्या आंतर राष्ट्रीय खेळाडू झाहीर पाशाने एअर इंडियाच्या झैद  अहमदला १५-९, २३-१७ असे सहज पराभूत करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु एअर इंडियाच्या अनुभवी विश्व् विजेत्या आर एम शंकरा व राष्ट्रीय विजेत्या एम नटराज जोडीने रिझर्व्ह बँकेच्या सूर्यप्रकाश व वी आकाश जोडीला २५-९, २५-१७ असे हरवून सामन्यात २-२- अशी बरोबरी केली. तिसऱ्या व महत्वाच्या लढतीत पहिल्यांदाच एअर इंडियाकडून खेळणाऱ्या संदीप दिवेने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने विश्व् विजेत्या  प्रशांत मोरेला पहिला सेट २५-२ असा सहज जिंकून संघाच्या विजयाकडे आगेकूच केली होती. परंतु प्रशांतने दुसरा सेट कसाबसा २३-२२ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसरा सेट अधिक रंगणार असा सर्वांचा अंदाज संदीपने फोल ठरविला आणि २५-४  असे सहज प्रशांतला पराभूत करून एअर इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत जैन इरिगेशनने विजय संपादन केला. त्याने बलाढ्य पेट्रोलियम संघाला २-१ असे हरविले. 


महिला आंतर संस्था सांघिक गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड सहज जिंकेल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र स्पर्धेच्या पुरस्कर्त्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या संघाने त्यांना कडवी झुंज दिली. विश्व् विजेत्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एस अपूर्वाने पी एस पी बी च्या माजी विश्व् विजेत्या रश्मी कुमारीला १९-१३, २५-४ असे हरवून संघाला आघाडी मिळवून दिली होती. परंतु पी एस पी बी च्या एस  झ्लावझकीने / परिमला  जोडीने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या परिमी निर्मला / दिपाली सिन्हा जोडी विरुद्ध १०-२३ असा पहिला सेट गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट २५-१७, २०-१४ असा जिंकून सामना बरोबरीत आणला.  तर तिसऱ्या सामन्यात आंतर राष्ट्रीय खेळाडू काजल कुमारी ( पी एस पी बी ) ला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मेधा मठकरी विरुद्ध विजयासाठी झगडावे लागले. काजलने हा सामना १६-१७, १९-१०, २५-६ असा खिशात घालत आपल्या पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाच्या विजयावर शिक्का मोर्तब केले. महिला आंतर संस्था सांघिक गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जैन इरिगेशनच्या संघाला २-१ असा विजय मिळाला. 

Web Title: National Carrom Competition: Prashant More - Ershad Ahmed in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.