पोरानं नाव काढलं; घरकामं करून कुटुंब सांभाळणाऱ्या आईला शिवछत्रपती पुरस्काराची भेट!

By स्वदेश घाणेकर | Published: February 16, 2019 08:00 AM2019-02-16T08:00:00+5:302019-02-16T08:00:04+5:30

मध्यम कुटुंबात जन्मलेला... स्वप्न पाहणारा आणि त्यासाठी झटणारा अनिकेत पोटे...

Mumbai Suburban kho-kho player Aniket Pote won Shivchhatrapati state award in 2017-18 | पोरानं नाव काढलं; घरकामं करून कुटुंब सांभाळणाऱ्या आईला शिवछत्रपती पुरस्काराची भेट!

पोरानं नाव काढलं; घरकामं करून कुटुंब सांभाळणाऱ्या आईला शिवछत्रपती पुरस्काराची भेट!

googlenewsNext

- स्वदेश घाणेकर 
मध्यम कुटुंबात जन्मलेला... स्वप्न पाहणारा आणि त्यासाठी झटणारा अनिकेत पोटे... अन्य मध्यमवर्गीयांप्रमाणे घर चालवण्यासाठी करावी लागणारी कसरत अनिकेतच्या कुटुंबीयांसाठीही चुकलेली नाही. अनिकेतचे वडील बेस्टमध्ये कामाला आणि त्यांना हातभार म्हणून आई घरकामं करते. अशा या कुटुंबातील मुलाला शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या घरात सणाचे वातावरण निर्माण होणे साहजिकच होते. पण हा पुरस्कार अनिकेतच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आईच्या कष्टाला मानाचा मुजराच ठरला...

राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली.  मल्लखांब क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे उदय देशपांडे यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्काराचा मान साताऱ्याच्या प्रियंका मोहिते (गिर्यारोहण) यांनी पटकावला. २०१७-१८ च्या पुरस्कार विजेत्यांत ५५ खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंत मुंबई उपनगरचा खो-खोपटू अनिकेतचेही नाव आहे. हा पुरस्कार २१ वर्षीय अनिकेतला नवी ऊर्जा देणारा ठरला. कोणतीही अपेक्षा नसताना अनिकेतचे नाव पुरस्कारार्थींच्या यादीत आले आणि पोटे कुटुंबीयांच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटू लागले. 

"मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला हे समजताच आईचे डोळ्यांत पाणी दाटले. मी राष्ट्रीय स्पर्धा जिंकून आलो होतो तेव्हा स्थानिक आमदार अभिनंदन करण्यासाठी घरी आले होते. तो दिवस आणि आजचा पुरस्कार जाहीर झाल्याचा दिवस, माझ्या कुटुंबीयांसाठी खूप खास आहे. पण आजचा दिवस हा माझ्या आईच्या कष्टाला केलेला मानाचा मुजराच ठरला," असे अनिकेत सांगत होता. हे यश मिळूनही त्याचे पाय जमिनीवर होते आणि याची प्रचिती त्याच्या बोलण्यातून येत होती.

वांद्रे येथील शासकीय वसाहतीत राहणारा अनिकेत रिझवी महाविद्यालयात कला शाखेच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. खो-खोसोबत सुरू झालेल्या प्रवासाचे दहावे वर्ष सुरू असताना हा पुरस्कार मिळणे अनिकेतसाठी भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे."पाचवीत असल्यापासून खो-खो खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला टंगळमंगळ सुरू होती. त्यामुळे खेळात सातत्य नव्हते आणि मला खो-खेळायला घेऊन जाण्यासाठी प्रशिक्षकांना घरी यावे लागायचे. पण एकदिवस सरांनी चांगलंच झापलं आणि खो-खोचा नियमित प्रवास सुरू झाला,'' असे अनिकेत सांगतो. 

दोन वर्षांतच म्हणजेच इयत्ता सातवीत असताना अनिकेतने पहिली राज्यस्तरीय स्पर्धा खेळली. आठवीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात त्याची निवड झाली. अनिकेत सांगतो," इथवर मजल मारेन असे वाटले नव्हते.  आयुष्यात जे समोर येईल त्याला सामोरे जाण्याचा निर्धार मी केला होता. त्यानुसारच वाटचाल सुरू होती आणि पुढेही राहणार. या प्रवासात आईची साथ मला लाभली. तिने माझ्यासाठी, या घरासाठी खूप काबाडकष्ट केले. त्यामुळे हा माझ्या कर्तृत्वाला मिळालेला पुरस्कार नसून माझ्या आईच्या त्यागाचा झालेला सन्मान आहे." 
अनिकेतने 18 वर्षांखालील व वरिष्ठ भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. दक्षिण आशियाई स्पर्धेत तो भारतीय संघाचा कर्णधार होता. इंग्लंड दौऱ्यातही तो संघाचा सदस्य होता. रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा त्याचा निर्धार आहे. अनिकेतचे दोन भाऊ क्रिकेट व कबड्डी खेळतात. 

एक लाखांचा ईनाम आईच्या अकाऊंटमध्ये... 
या पुरस्काराबरोबर मिळणाऱ्या एक लाख रोख रकमेच काय करणार यावर अनिकेत म्हणाला,"एवढी रक्कम खर्च नाही करणार. मला आतापर्यंत मिळालेल्या बक्षीस रक्कम मी आईच्या अकाऊंटमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केले आहेत आणि ही रक्कमही आईच्याच अकाऊंटमध्ये जमा करणार आहे. घरच्यांच्या सल्ल्याशिवाय यातील एकही रकम खर्च करणार नाही."

Web Title: Mumbai Suburban kho-kho player Aniket Pote won Shivchhatrapati state award in 2017-18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.