आमदार चषक कबड्डी : मुंबई बंदरने आणले एअर इंडियाचे विमान जमिनीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 12:48 PM2018-04-27T12:48:36+5:302018-04-27T12:48:36+5:30

आघाडी-पिछाडीच्या अभूतपूर्व खेळानंतर पेटून उठलेल्या मुंबई बंदराने बलाढ्य एअर इंडियाचे आघाडीवर असलेले विमान जमीनीवर उतरवत आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्याच साखळी लढतीत 51-43 असा विजय नोंदवला.

MLA Cup Kabaddi: Mumbai Port, Central Railway, Maharashtra Police Win | आमदार चषक कबड्डी : मुंबई बंदरने आणले एअर इंडियाचे विमान जमिनीवर

आमदार चषक कबड्डी : मुंबई बंदरने आणले एअर इंडियाचे विमान जमिनीवर

Next

मुंबई - आघाडी-पिछाडीच्या अभूतपूर्व खेळानंतर पेटून उठलेल्या मुंबई बंदराने बलाढ्य एअर इंडियाचे आघाडीवर असलेले विमान जमीनीवर उतरवत आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्याच साखळी लढतीत 51-43 असा विजय नोंदवला. तसेच मध्य रेल्वे, महाराष्ट्र पोलीस आणि बलाढ्य भारत पेट्रोलियमने देखण्या विजयासह आपले विजयी अभियान सुरू केले. 
प्रभादेवीच्या मुरारी घाग मार्गावर चवन्नी गल्लीत सुरू झालेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेने आज सारा परिसर कबड्डीमय झाला होता. मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आमदार सदा सरवणकर, आयोजक आणि नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.  एअर इंडिया आणि मुंबई बंदर यांच्यात खेळला गेलेला सामना ख-या अर्थाने चढउतारांचा सामना होता. शिवराज जाधव आणि गणेश डेरंग यांच्या जोरदार चढायांनी एअर इंडियावर लोण चढवत बंदराला पहिल्या दहा मिनिटातच 15-10 अशी आघाडी मिळवून दिली होती. तेव्हाच एअर इंडियाच्या उमेश म्हात्रेच्या एका चढाईने सामन्याचा सारा चेहरा बदलून टाकला. त्याने एकाच चढाईत मैदानात असलेले चारही खेळाडू बाद करून बंदरवर अनपेक्षितपणे लोण चढवला. या चढाईमुळे पिछाडीवर असलेली एअर इंडिया मध्यंतराला 24-17 अशी आघाडीवर पोहोचली. उत्तरार्धाचा खेळ सुरू होताच तिस-या मिनिटालाच त्यांनी आणखी एक लोण चढवत बंदरवर 28-20 अशी जबरदस्त आघाडी मिळवली.  पण सामन्याने पुन्हा एकदा रंग दाखवला. 22-31 अशा पिछाडीवर असलेल्या बंदरच्या संघात जान शिवराज जाधवच्या एका भन्नाट चढाईने  आणली . त्याने एअर इंडियाच्या रक्षकांना चकवत  3 गुण टिपले. या गुणांमुळे त्यांनी केवळ 31-31 अशी बरोबरीच साधली नाही तर लोणही लादला. त्यानंतर बंदराने आपल्या गुणांचा सपाटा कायम राखत सामन्यावर पकड मजबूत करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आघाडीवर असलेल्या बंदरची आघाडी कमी करणे एअर इंडियाला शक्य झाले नाही आणि त्यांना 43-51 अशी 8 गुणांनी हार सहन करावी लागली.  
अन्य लढतींमध्ये  प्रो कबड्डीच्या स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारत पेट्रोलियमने युनियन बँकेवर मात करत  दणदणीत सलामी दिली. निरस आणि कंटाळवाण्या सामन्यात भारत पेट्रोलियमने मध्यंतरातील 24-9 अशा आघाडीनंतर 35-18 असा सहज विजय नोंदविला. मध्य रेल्वेने देना बँकेचे आव्हान 46-36 असे परतावून लावले. रेल्वेच्या श्रीकांत जाधवने एका चढाईत टिपलेले चार गुण या सामन्याचे वैशिष्टय होते. गुरूविंदर सिंग आणि आतिश धुमाळ यांच्याही दमदार खेळामुळे रेल्वेने हा सामना कोणत्याही अडचणीविना जिंकला.    
महाराष्ट्र पोलीस आणि बँक ऑफ इंडिया यांच्यातील लढतही थरारक झाली. महेश मकदूम आणि महेंद्र राजपूत यांच्या वेगवान चढायांनी महाराष्ट्र पोलीसांना मध्यंतरालाच 18-8 अशी दणदणीत आघाडी मिळवून दिली होती. उत्तरार्धाच्या खेळात विराज उतेकर आणि सुरज सुतळे यांनी चांगला खेळ करून संघाचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सामना संपायला 7 मिनीटे असताना बँक ऑफ इंडियाने भन्नाट खेळ करीत 18-31 अशा पिछाडीवरून शेवटच्या मिनिटाला खेळ 31-34 असा आणला. पण त्यांची धडपड वाया केली आणि पोलीसांनी 35-31 अशी बाजी मारली. 

Web Title: MLA Cup Kabaddi: Mumbai Port, Central Railway, Maharashtra Police Win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.