हो ची मिन्ह सिटी :  बॉक्सिंगमध्ये पाचवेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकावणारी भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतील मेरी कोम हिचे हे पाचवे आणि 48 किल वजनी गटातील पहिले सुवर्णपदक आहे. आज झालेल्या महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोम हिने उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिच्यावर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

रियो आॅलिम्पिकसाठीची पात्रता मिळवण्यात  मेरीला अपयश आले होते. त्यानंतर बऱ्याच काळानंतर मेरी कोम हिने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.  तत्पूर्वी मंगळवारी झालेल्या उपांत्य लढतीत मेरी कोमने जपानच्या सुबासा कोमुराचा ५-० ने पराभव केला होता. तर अंतिम लढतीतील मेरीची प्रतिस्पर्धी  हयांग हिने मंगोलियाच्या एम. म्यांगमारदुलामचा पराभव केला होता. 
 राज्यसभा सदस्य, आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती ३५ वर्षीय मेरी कोम पाच वर्षे ५१ किलो वजनगटात सहभागी झाल्यानंतर ४८ किलो वजनगटात परतली आहे. मात्र काल झालेल्या उपांत्य लढतीत चार वेळा सुवर्णपदक पटकावणारी एल. सरितादेवी हिला (६४ किलो) पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत सरितादेवीला चीनच्या दोऊ डॅनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.


त्याआधी झालेल्या उपांत्यपूर्व लढतींमध्ये आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोम हिने ४८ किलो लाइट फ्लायवेट गटात उपांत्यपूर्व फेरीत तैवानची खेळाडू मेंग ची पिन ला पराभूत करत अंतिम चारमध्ये जागा मिळवली होती.  


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.