jaltaran, Gymnastics, Maharashtra's golden fourscore | जलतरण, जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार
जलतरण, जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार

- अमोल मचाले

पुणे : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये अव्वलस्थान पटकविण्याचा निर्धार केलेल्या यजमान महाराष्ट्र संघाने स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही पदकतालिकेत अव्वलस्थान कायम राखले. शनिवारी जलतरण आणि जिम्नॅस्टिक या प्रकारांत चमकदार कामगिरी करीत महाराष्टÑाच्या खेळाडूंनी प्रत्येकी चार सुवर्णपदके जिंकली.


म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. आज महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २३ पदके जिंकली. आतापर्यंत महाराष्ट्राने ४१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४२ कांस्यपदकांसह एकूण ११५ पदकांची कमाई करीत दिल्ली आणि हरियाणा या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे.


जलतरणात आज महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करताना चार सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण सात पदकांची कमाई केली. १७ वर्षांखालील मुलींच्या ४०० मीटर मेडले प्रकारात अपेक्षा फर्नांडिस अव्वल ठरली. तिने ५ मिनिटे २३.३६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकाविले. कन्या नायर (मध्य प्रदेश) आणि श्रुंगी बांदेकर (गोवा) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक प्राप्त केले.
१७ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात निशा गुप्ताने ५९.७८ सेकंद वेळेसह सुवर्णपदक आपल्या नावे केले. २१ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात पुण्याच्या साध्वी धुरी हिने १ मिनिट १.०२ सेकंद वेळेसह बाजी मारली. कर्नाटकच्या दीक्षा रमेश हिने रौप्य, तर गोव्याच्या सुमन पाटीलने कांस्यपदक मिळविले.

मुलांच्या जलतरणात महाराष्ट्राच्या मिहीर आम्ब्रे याने २१ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक मिळवले. कर्नाटकच्या अविनाश मणी याला रौप्यपदक मिळाले. २१ वर्षांखालील मुलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुश्रुत ४ मिनिटे १०.७५ सेकंद वेळेसह दुसरा आला. दिल्लीच्या कुशाग्र रावत याने (४.१.८३) सुवर्णपदक पटकाविले. २१ वर्षांखालील मुलींच्या १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ऋतुजा तळेगावकर १८ मिनिटे ५३.३६ सेकंद वेळेसह दुसरी आली. तमिळनाडूची डी. भाविका (१८.१३.०७) सुवर्णपदकाची मानकरी ठरली.


२१ वर्षांखालील मुलांच्या ४ बाय १०० मीटर मेडले प्रकारात महाराष्टाच्या वाट्याला रौप्यपदक आले. श्वेजल मानकर, मिहीर आम्ब्रे, जय एकबोटे आणि अरॉन फर्नांडिस यांच्या संघाने ४ मिनिटे १.७० सेकंदांची वेळ दिली. कर्नाटकच्या संघाने सुवर्ण पटकावले
जिम्नॅस्टिकमध्ये जिगरबाज कामगिरी जिम्नॅस्टिक प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिगरबाज कामगिरी करीत चार सुवर्ण आणि
दोन रौप्य अशी सहा पदके शनिवारी आपल्या नावे केली. ही सर्व पदके २१ वर्षांखालील गटातील खेळाडूंनी जिंकली.


मुलींच्या रिबन प्रकारात अदिती दांडेकर हिने किमया कदम हिला मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. अदितीने ४५.४०, तर किमयाने ४१ गुण मिळविले. मुलींच्या अनइव्हन बार प्रकारात वैदेही देऊळकर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. मुलांच्या रोमन रिंग प्रकारामध्ये ओंकार शिंदे १२.०५ गुणांसह अव्वल ठरला.


ज्युदोमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला एक रौप्य आणि कांस्यपदक आले. २१ वर्षांखालील मुलांच्या ७३ किलो गटात निशांत गुरवने रौप्यपदक मिळवले. २१ वर्षांखालील मुलींच्या ४८ किलो गटात विद्या लोहार कांस्यपदकाची मानकरी ठरली. नेमबाजीत हर्षवर्धन यादवने २१ वर्षांखालील गटात कांस्यपदक मिळवले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.