डावाच्या मधल्या षटकांमध्ये चेंडू हार्ड नसल्याची झळ बसली आणि त्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. उपाहारानंतरच्या सत्रामध्ये भारताला बळी घेता आला नाही. त्या वेळी पीटर हँडस्कोंब व शॉन मार्श खेळपट्टीवर होते.
कोहली म्हणाला, ‘रविवारी रात्री चेंडू नवा होता, त्या वेळी तो चांगला वळत होता. आज सकाळच्या सत्रातही चेंडू चांगला होता. पण, उपाराहानंतर चेंडूचा हार्डनेस कमी झाला. खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू वेगाने जात नव्हता. पाचव्या दिवशी खेळपट्टी संथ झाली होती. आम्ही नव्या चेंडूने काही बळी घेतले, पण मधल्या षटकांमध्ये चेंडू हार्ड नसल्यामुळे फटका बसला.’ पहिल्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. त्या वेळी गोलंदाजांचे काम सोपे नव्हते. दुसऱ्या डावात त्यांनी चांगली फलंदाजी केली.
विराटचा आरोप स्मिथने फेटाळला-
आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांचा अपमान केल्याचा आरोप कर्णधार विराट कोहलीने केला आहे, तर प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्हन स्मिथने कोहलीचा आरोप फेटाळला आहे.
कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी (चार ते पाच) पॅट्रिक यांचे नाव घेतले. ते आमचे फिजिओ आहेत. आमच्यावर उपचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्या खेळाडूंनी असे का केले, याचे कारण मला कळले नाही. त्या खेळाडूंनी पॅट्रिकचे नाव का घेतले, याबाबत तुम्ही त्यांना विचारायला हवे.’
कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. फरहार्ट यांनी मैदानावर धाव घेतली; पण कोहलीला फिजिओसह मैदान सोडावे लागले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल कोहलीच्या दुखापतीची खिल्ली उडवीत असल्याचे दिसून आले. भारतीय कर्णधारानेही रविवारी वॉर्नर बाद झाल्यानंतर तशीच प्रतिक्रिया दिली होती.