ह्याला म्हणतात जिद्द...जत्रेत फुगे फोडणाऱ्या नेमबाज सौरभला ऑलिम्पिकचं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 03:39 PM2019-02-24T15:39:16+5:302019-02-24T15:39:40+5:30

ISSF World Cup: शेतकऱ्याच्या मुलाची नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी

ISSF World Cup: 16 year's Saurabh Chaudhry wins Gold medal and Olympic quota | ह्याला म्हणतात जिद्द...जत्रेत फुगे फोडणाऱ्या नेमबाज सौरभला ऑलिम्पिकचं तिकीट

ह्याला म्हणतात जिद्द...जत्रेत फुगे फोडणाऱ्या नेमबाज सौरभला ऑलिम्पिकचं तिकीट

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीनं रविवारी ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानं 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात 245 गुणांच्या विश्व विक्रमासह हे सुवर्णपदक जिंकले. प्रथमच वरिष्ठ स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होताना त्याने या अविश्वसनीय कामगिरीसह 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही जिंकले. 2016 नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अंतिम फेरीत एकदाही पराभूत न होण्याचा सपाटा सौरभने लावला आहे.



सौरभने आशियाई स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. अवघ्या 16व्या वर्षी सौरभने भारताला सुवर्ण जिंकून दिले होते. प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सौरभने 240.7 या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याच कामगिरीचे सातत्य राखताना त्याने वर्ल्ड कप स्पर्धेतही इतिहास घडवला. त्याने सर्बियाच्या डॅमिक माकेस ( 239.3 ) आणि चीनच्या वेई पँग ( 215.2 ) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले.


जर्मनीत झालेल्या कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सौरभने विश्व विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदक नावावर केले होते. त्याने 243.7 गुणांची कमाई करताना हे पदक जिंकले होते. चायनीज तैपेईच्या वँग झेहाओ ( 242.5) याच्या नावावर कनिष्ठ गटाचा विश्वविक्रम होता. सौरभच्या या कामगिरीनंतर आशियाई स्पर्धेतही त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या आणि त्यावर तो खरा उतरला होता. त्याने वरिष्ठ वर्ल्ड कपमध्येही आपली दखल घेण्यास भाग पाडले. 


सौरभला जत्रेत फुगे फोडायचे प्रचंड वेड ... 
सौरभच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. पण गावात वर्षातून एक जत्रा नक्की भरायची. त्यासाठी हा पठ्या पैसे साठवायचा. कारण त्याला जत्रेत फुगे फोडायचे प्रचंड वेड होते. तो जत्रेत फुगे फोडायला गेला की बक्षिस नक्कीच जिंकणार, ही त्याच्या घरच्यांनाही खात्री होती. त्यानेही घरच्यांना कधीच निराश केले नाही.  मेरटमधील कलिना गावात सौरभचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत सौरभ शेतीचं काम करत होता. 


शेतीत तो रमत असला तरी त्याच्यातले गुण प्रशिक्षकांनी हेरले. त्यानंतर तीन वर्षांतच त्याने ही गगन भरारी घेतली. पण सुवर्णपदक पटकावल्यावरही सौरभला आठवण आली ती आपल्या शेतीची. सौरभचे वडिल शेतकरी होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. पण घरच्यांनी सौरभला पूर्णपणे पाठिंबा द्यायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी सौरभला बंदूक घेऊन देण्यासाठी पैसे जमवले आणि त्याला एक लाख 75 हजारांची बंदूक घेऊन दिली.
पाहा व्हिडीओ...

Web Title: ISSF World Cup: 16 year's Saurabh Chaudhry wins Gold medal and Olympic quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.