ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 19 - ऑस्ट्रेलियातील टी २० बिग बॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्सचा स्टार गोलंदाज सुनिल नरेन या सत्रात अचानक फलंदाजीला आला आणि त्याने दमदार सलामी दिली. बिग बॅशच्या या सत्रातील १२ वा सामना १ जानेवारी २०१७ रोजी खेळला गेला. मेलबर्न स्टारचा संघ नेहमीप्रमाणे योजना बनवून मैदानात उतरला होता. मात्र अचानक अ‍ॅरॉन फिंचच्या साथीला सुनिल नरेनला सलामीला पाहून मेलबर्न स्टार्स गडबडले. 
नरेनने १३ चेंडूत २१ धावांची दमदार सलामी दिली. आयपीएल १० च्या सत्रात केकेआरने याचाच कित्ता गिरवला. नेट्समध्ये सुनिल नरेनला गोलंदाजी पेक्षा फलंदाजीचा जास्त सराव देत ख्रिस लीन आणि सुनिल नरेन यांच्यावर मोठा जुगार खेळला आणि तो यशस्वी देखील ठरला.  या स्पर्धेत नरेन याने सर्वात वेगवान १५ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने आपला संघ सहकारी युसुफ पठाण याची बरोबरी केली.  
आयपीएलच्या नवव्या सत्रात केकेआरच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेला नरेन या सत्रातील एक उत्तम फलंदाज ठरला आहे. १३ सामन्यात १७८ च्या स्ट्राईक रेटने २१४ धावा कुटल्या आहेत. जगाभरातील विविध लीगमध्ये खेळताना सुनिल नरेन याने २३१ सामन्यात ८०२ धावा केल्या आहेत. त्यात या सत्रातील २१४ धावांचा देखील समावेश आहे. तर त्याने आतापर्यंत २७८ गडी बाद केले आहेत. आंतराराष्ट्रीय टी २० मध्ये ४३ सामन्यात १४५ धावा आणि ४४ बळी घेण्याची कामगिरी केली आहे.