थॉमस, उबेर कपमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:34 AM2018-05-21T02:34:22+5:302018-05-21T02:34:22+5:30

भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.

India's disappointing start in Thomas, Uber Cup | थॉमस, उबेर कपमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात

थॉमस, उबेर कपमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात

Next

बँकॉक : भारताला पुरुष व महिला विभागात युवा खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे रविवारी थॉमस व उबेर कप बॅडमिंटनमध्ये अनुक्रमे फ्रान्स व कॅनडाविरुद्ध १-४ अशा समान फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
त्यामुळे भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. भारतीय पुरुष संघाला जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील एच. एस. प्रणय आणि मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी न खेळण्याचा फटका बसला. भारताच्या युवा व अनुभवहीन संघाचा फ्रान्सच्या कमी मानांकन असलेल्या खेळाडूंविरुद्ध टिकाव लागला नाही. जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या बी. साई प्रणीतने ब्राईस लेवरडेजचा २१-७, २१-१८ ने पराभव करीत भारताला सकारात्मक सुरुवात करून दिली; पण अन्य खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दिवसाच्या दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेल्या एम. आर. अर्जुन
व रामचंद्र श्लोक यांना पुरुष दुहेरीमध्ये दडपण झुगारता आले नाही. त्यांना बास्टियान कारसौडी व ज्युलियन माइयो या जागतिक क्रमवारीतील ४७ व्या क्रमांकावरील जोडीविरुद्ध १३-२१, १६-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
स्वीस ओपन चॅम्पियन समीर वर्मावर त्यानंतर भारताला पुनरागमन करून देण्याची जबाबदारी होती; पण जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानावर असलेला हा खेळाडू एकेरीच्या दुसºया लढतीत ४३ व्या स्थानावर असलेल्या लुकास कोर्वीविरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत १८-२१, २२-२०, १८-२१ ने पराभूत झाला.
दुहेरीच्या दुसºया लढतीत अरुण जॉर्ज व संयम शुक्ला या ७० व्या मानांकित जोडीला क्रमवारीत १०३ व्या स्थानावर असलेल्या थोम गिक्वेल व रोहन लाबेर यांच्याकडून केवळ २८ मिनिटांमध्ये १०-२१, १२-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्य सेनने त्यानंतर काही वेळ संघर्ष केला; पण त्यालाही एकेरीच्या तिसºया लढतीत टोमा ज्युनिअर पोपोव्हविरुद्ध २०-२२, २१-१९, १९-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताला यानंतर सोमवारी पुढच्या लढतीत आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला समोरे जावे लागणार आहे.
उबेर कप स्पर्धेत भारतीय संघ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जोडी अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांच्याविना सहभागी झाला. भारताची भिस्त सायना नेहवालवर अवलंबून होती; पण यापूर्वी दोनदा कांस्यपदक जिंकणाºया भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही.

मेघना, पूर्विशाने केल्या आशा पल्लवीत...
1राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सायनाला पहिल्या लढतीत कॅनडाच्या मिशेली लीविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतरही २१-१५, १६-२१, १६-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. युवा वैष्णवी जक्का रेड्डीचा कॅनडाच्या राचेल होंड्रिचविरुद्ध निभाव लागला नाही. तिला ११-२१, १३-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.

2दुहेरीमध्ये मेघना जकामपुडी व पूर्विशा एस. राम या ४१ व्या मानांकन असलेल्या जोडीने मिशेल टोंग व जोसफाईन वू यांचा २७ मिनिटांमध्ये २१-१९, २१-१५ ने पराभव करीत भारताच्या आशा पल्लवीत केल्या; पण कृष्णा प्रिया कुद्रावल्ली हिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तिला ब्रिटनी टॅमविरुद्ध ११-२१, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
3कॅनडाने या विजयासह ३-१ ने विजयी आघाडी घेतली होती. आता अखेरची लढत केवळ औपचारिक होती. त्यात संयोगिता घोरपडे व प्राजक्ता सावंत जोडीला राचेल होंड्रिच व ख्रिस्टन साई यांच्याविरुद्ध १५-२१, १६-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. महिला संघाला सोमवारी आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: India's disappointing start in Thomas, Uber Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.