रांची : आॅस्ट्रेलियन फलंदाजांच्या लढवय्या बाण्यापुढे भारतीय गोलंदाजांना कसलीच कमाल करता आली नाही. स्टीव्ह स्मिथ अँड कंपनीने सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून मालिकेत रंगत कायम ठेवली.
भारताने पहिला डाव ९ बाद ६०३ धावसंख्येवर घोषित केल्यानंतर रविवारी दिवसअखेर आॅस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात २ बाद २३ अशी अवस्था झाली होती. आज त्यापुढे खेळताना आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ बाद २०४ धावांची मजल मारली असता, उभय कर्णधारांनी सामना अनिर्णीत संपल्याचे मान्य केले.
आॅस्ट्रेलियातर्फे पीटर हँड्सकोंब व शॉन मार्श यांनी निर्णायक भूमिका बजावली. हँड्सकोंब ७२ धावा काढून नाबाद राहिला, तर मार्शने ५३ धावांची खेळी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी करून आॅस्ट्रेलियाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्याआधी, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (२१) व मॅट रेनशॉ (१५) यांना मोठी खेळी करता आली नाही. भारतातर्फे पुन्हा एकदा रवींद्र जडेजाने अचूक मारा करताना ५४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियातर्फे हँड्सकोंब २०० चेंडू खेळून नाबाद राहिला.
उपाहारापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा धोकादायक भासत होता; पण आॅस्ट्रेलियाने अखेरच्या दोन सत्रांत संयमी खेळी करून सामना अनिर्णीत राखला. मालिका आता १-१ ने बरोबरीत असून २५ मार्चपासून धरमशाला येथे चौथा व अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल. या केंद्रावर प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात येत आहे. उभय संघांदरम्यान पुन्हा एकदा वादाचे चित्र बघायला मिळाले. रेनशॉ व ईशांत यांच्यादरम्यान वाद झाला. त्यानंतर ईशांतने रेनशॉला पायचित केले. चेतेश्वर पुजारा व रिद्धिमान साहा यांच्यादरम्यानच्या मॅरेथॉन भागीदारीच्या जोरावर भारताने वर्चस्व मिळविल्याचे चित्र होते; पण हँड्सकोंब व मार्श यांनी दडपणाखाली चमकदार खेळी केली. मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांमध्ये माजी कर्णधार व रांचीचा लाडका सुपुत्र महेंद्रसिंह धोनीचा समावेश होता.
त्याआधी, भारताने सकाळच्या सत्रात रेनशॉ व पहिल्या डावातील शतकवीर स्मिथ यांना चार चेंडूंच्या अंतरात माघारी परतवले. उपाहारापर्यंत आॅस्ट्रेलियाची ४ बाद ६३ अशी अवस्था होती. त्यानंतर आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या सत्रात संयमी खेळी केली. दुसऱ्या सत्रादरम्यान धोनी मैदानात पोहोचला. त्याने प्रेक्षकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. (वृत्तसंस्था)
वादानंतर ईशांतने रेनशॉला तंबूत परतवले
सोमवारी पुन्हा एकदा वाद अनुभवायला मिळाला. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि युवा सलामीवीर मॅट रेनशॉ यांच्यात अखेरच्या दिवशी वाद झाला.
‘तू-तू...मैं-मैं’नंतर ईशांतने भेदक मारा करताना दुसऱ्या डावात सलामीवीर रेनशॉला पायचीत केले. ईशांतने षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी धाव घेतली असता साईटस्क्रीनजवळ काही हालचाल झाल्यामुळे रेनशॉ क्रिजवरून बाजूला झाला. सलग ४ षटके गोलंदाजी करणाऱ्या ईशांतने चेंडू रेनशॉच्या काही अंतरावर यष्टिरक्षकाकडे फेकला. त्यानंतर ईशांत आणि रेनशॉ यांच्यादरम्यान वाद झाला.
पंचांनी लगेच कोहलीला बोलावले. काही मिनिटांनंतर ईशांत गोलंदाजीसाठी तयार झाला आणि रेनशॉला आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. तो त्याच्या थाय पॅडला लागून हेल्मेटच्या ग्रिलवर आदळला. त्यानंतरचा चेंडूही बाउन्सर होता. त्यामुळे रेनशॉ दडपणाखाली आला. ईशांतने त्यानंतर फुललेंथ चेंडू टाकला आणि हा चेंडू यष्टीपुढे रेनशॉच्या पॅडवर आदळला व पंचानी त्याला पायचीत बाद दिले.
कोणत्याही कसोटी संघाच्या कर्णधारासाठी रविंद्र जडेजा सर्वात धोकादायक गोलंदाज असल्याचं पुन्हा एकदा त्याने सिद्ध केले आहे. आज (सोमवार) सकाळच्या सत्रात जडेजाच्या एका अप्रतिम चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ चुकला आणि क्लिनबोल्ड झाला. लेग स्टम्पच्या बाहेर पडलेला त्याचा चेंडू बॅटऐवजी पॅडने अडवण्याचा स्मिथचा प्रयत्न त्याची दांडीच उडाली.
धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव ४५१. भारत पहिला डाव ९ बाद ६०३ (डाव घोषित). आॅस्ट्रेलिया दुसरा डाव :- डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. जडेजा १४, मॅट रेनशॉ पायचित गो. शर्मा १५, नॅथन लियोन त्रि. गो. जडेजा २, स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. जडेजा २१, शॉन मार्श झे. विजय गो. जडेजा ५३, पीटर हँड्सकोंब नाबाद ७२, ग्लेन मॅक्सवेल झे. विजय गो. आश्विन २, मॅथ्यू वेड नाबाद ९. अवांतर : १६. एकूण : १०० षटकांत ६ बाद २०४. बाद क्रम : १-१७, २-२३, ३-५९, ४-६३, ५-१८७, ६-१९०. गोलंदाजी : आश्विन ३०-१०-७१-१, जडेजा ४४-१८-५४-४, यादव १५-२-३६-०, शर्मा ११-०-३०-१.