क्रीडागुणांबाबत सरकार फेरविचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:57 AM2019-01-21T01:57:56+5:302019-01-21T01:58:05+5:30

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडागुण देण्याबाबत राज्य सरकारने नवी पद्धत अवलंबली आहे.

Government rethink about sports issues | क्रीडागुणांबाबत सरकार फेरविचार करणार

क्रीडागुणांबाबत सरकार फेरविचार करणार

googlenewsNext

पुणे : शालेय विद्यार्थ्यांना क्रीडागुण देण्याबाबत राज्य सरकारने नवी पद्धत अवलंबली आहे. नव्या गुणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना कात्री लावण्यात आल्याने खेळाडू आणि पालकवर्गांत याबाबत नाराजी आहे. त्याची दखल घेत या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल. याबाबत येत्या २ दिवसांत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी रविवारी दिली.
‘खेलो इंडिया यूथ गेम्स’ ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाली. स्पर्धेच्या समारोप सोहळ्यापूर्वी तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, खेळण्यात सातत्य असेल तरच भविष्यात प्रतिभावान खेळाडू घडू शकतील. यापुढे क्रीडागुणांसाठी विद्यार्थ्यांना १०वी-१२वीतही खेळणे अनिवार्य असेल. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १५ तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी
२० गुण देण्याबाबत विचार सुरू आहे. क्रीडा आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या आगामी बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
क्रीडागुणांचा बाजार टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया क्रीडागुणांचा बाजार मांडला जाणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. जिल्हा वा राज्यस्तरीय स्पर्धा झाल्यानंतर खेळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्या स्पर्धांचे निकाल प्रसिद्ध करणे बंधनकारक केले जाईल. शिवाय क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावरही हे अपलोड करण्यात येतील. क्रीडागुणांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्रे मिळू नये, याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत. यासाठी क्रीडाविभागाची निकालांची माहिती शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला लिंक करण्यात येईल. त्यासाठी आमचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येत्या २-३ महिन्यांत याबाबतचा आढावा घेतला जाईल. आगामी शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे तावडे म्हणाले.
विद्यार्थी-खेळाडूंसाठी गाईड सेंटर...
यापुढे खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज असणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी गाईड सेंटर उभारण्यात येतील, असे सांगून तावडे म्हणाले, ‘‘उपलब्ध वेळेनुसार हे विद्यार्थी या सेंटरमध्ये जाऊन अभ्यास करतील. त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांचीही व्यवस्था करण्यात येईल. खेळाडू विद्यार्थ्यांना
त्यांच्या सोयीनुसार वर्षातून दोनदा परीक्षा देण्याची व्यवस्था
करण्यात येईल.’’
>शाळेत खेळाचा १ तास अनिवार्य करणार : जावडेकर
शाळांमध्ये पुस्तकी अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर शिकविला जातो. खेळाकडेही शालेय स्तरावर जास्त लक्ष देणार असल्याचे नमूद करीत यापुढे प्रत्येक शाळेत खेळासाठी १ तास राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री जावडेकर यांनी केली. ते म्हणाले, ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्मितीसाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. खेळाच्या माध्यमातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे. मैदानावर घडणारा भारत हाच भविष्यातील भारत असेल.
>कमी पडलेल्या खेळांकडे लक्ष देऊ
महाराष्ट्राने स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली असली तरी काही खेळांत यजमानांची कामगिरी निराशाजनक ठरली. बास्केटबॉल आणि
हॉकीत तर महाराष्ट्राची पाटी कोरी राहिली. हा धागा पकडून तावडे म्हणाले, ‘‘कोणत्या खेळात आपण कमी पडलो याचे पोस्टमार्टम केले जाईल. स्पर्धेतील प्रत्येक खेळाच्या कामगिरीचा अहवाल मागविण्यात
आला आहे. त्याचा आम्ही लवकरच आढावा घेऊ. कमी पडलेल्या
खेळांकडे विशेष लक्ष देऊन कामगिरी उंचावण्यासाठी योग्य ती पावले उचलले जातील.

Web Title: Government rethink about sports issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.