- ऑनलाइन लोकमत 
रिओ दी जानेरो, दि. 18 - रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत पैलवान साक्षी मलिकने भारताचं खातं उघडून दिलं आहे.  ऑलिम्पिकमध्ये अखेर बारा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भारताला साक्षी मलिकमुळे पहिले पदक मिळाले आहे. महिला कुस्तीच्या ५८ किलो वजनी गटात पैलवान साक्षी मलिकनं भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले. साक्षी मलिकनं रिओ ऑलिम्पिकमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कारण ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी मलिक पहिलीच भारतीय महिला पैलवान ठरली आहे.
 
 
ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत कोणत्याही महिला पैलवानाने पदक जिंकलेलं नाही. साक्षी मलिक पदक जिंकणारी पहिलीची भारतीय महिला पैलवान ठरली आहे. सोबतच साक्षी मलिकचं पदक भारताचं कुस्तीतलं पाचवं पदक ठरलं आहे, तर महिला कुस्तीतलं पहिलं ऑलिम्पिक पदक आहे. साक्षी मलिक ही भारताची चौथी ऑलिम्पिक पदकविजेती पैलवान ठरली आहे. 
1952 मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक मिळवलं होतं. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने कांस्यपदक तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनेदेखील कांस्यपदक आपल्या नावावर केलं होतं. त्यानंतर आता 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकत कुस्तीतलं पाचवं पदक मिळवलं आहे. 
यासोबतच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साक्षी मलिक चौथीच भारतीय महिला आहे. याआधी कर्णम मल्लेश्वरी, मेरी कोम आणि सायना नेहवालनं पदक जिंकलेलं आहे.  
 
 

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.