पुणे : ‘टीम इंडियाचा दर्जा सर्वोत्तम आहे. संघातील सर्वच खेळाडू कायम एकमेकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतात. यामुळे आगामी काळात कर्णधारपद ओझे जाणवणार नाही,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.
पुण्यात येत्या रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना होत आहे. त्यासाठी भारतीय संघ मंगळवारी रात्री पुण्यात दाखल झाला. बुधवारी एका खासगी कार्यक्रमानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी तो म्हणाला, ‘सर्व प्रकारातील कर्णधारपद स्विकारल्यानंतर आगामी काळात माझ्या वैयक्तिक खेळावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार
नाही, याची मला खात्री आहे. कर्णधारपद ओझे वाटत नसून, एक आव्हान म्हणून मी ते स्वीकारले आहे. प्रत्येक खेळाडूचे कच्चे दुवे दूर करण्यावर आम्ही मेहनत घेत आहोत. यासाठी वरिष्ठांचाही सल्ला घेऊ.’
सातत्याने संघासाठी चांगली कामगिरी करीत असताना, नेतृत्व सोपवण्यात आल्याने जास्त आनंद झाला असल्याचे कोहलीने सांगितले. किमान २०१९च्या विश्वचषकापर्यंत कर्णधारपद सांभाळण्याची इच्छा कोहलीने एका प्रश्नाचे उत्तर देताना अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. तो म्हणाला, ‘२०१९च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत माझ्याकडे कर्णधारपद राहिले, तर आयुष्यातील ती उल्लेखनीय कामगिरी असेल.’ (क्रीडा प्रतिनिधी)
मी सचिनचा फॅन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फॅन असल्याने कोहलीने या वेळी नमूद केले. ‘सध्या मी त्याच्याप्रमाणे मेहनत घेत आहे. यशाच्या शिखरावर असतानाही मेहनत घेण्याची सचिनची वृत्ती सर्वांनी शिकण्यासारखी आहे,’ असे त्याने सांगितले.
करिअरमधील ४ महत्त्वाचे क्षण
आतापर्यंतच्या करिअरमध्ये चार क्षण माझ्या दृष्टीने मोलाचे असल्याचे कोहलीने सांगितले. त्यामध्ये २०११मध्ये जिंकलेले एकदिवसीय विश्वचषक, कसोटीमध्ये भारताने पुन्हा अव्वल स्थान प्राप्त करणे, मोहाली येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक टी२० तील खेळी आणि मुंबई कसोटीत इंग्लंडविरुद्ध लगावलेले द्विशतक यांचा समावेश आहे.
पुण्यातील स्टेडियम उत्कृष्ट
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम देशातील सर्वोत्तम स्टेडियमपैकी एक आहे. या मैदानावर खेळण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. स्टेडियमची देखभाल चांगल्या प्रकारे होत असल्याने त्याचा दर्जा कायम आहे, असेही कोहली म्हणाला.