ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 20 - जोस बटलर आणि नितीश राणा यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सलग पाचवा विजय मिळवताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा ८ विकेट्सने फडशा पाडला. पंजाबने दिलेले १९९ धावांचे भलेमोठे आव्हान मुंबईने तब्बल २७ चेंडू राखून सहजपणे परतावले. यासह पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावताना मुंबईने आपली धावगतीही मजबूत केली.

होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने हाशिम आमलाच्या (१०४*) शानदार शतकाच्या जोरावर निर्धारित षटकांत ४ बाद १९८ धावांची मजबूत मजल मारली. या वेळी मुंबई इंडियन्सचा अश्वमेध रोखला जाणार अशीच चर्चा होती. परंतु, बटलर - पार्थिव पटेल यांना हे मान्य नव्हते.
या दोघांनी ३५ चेंडंूत ८१ धावांची वेगवान सलामी दिली. मार्कस स्टोइनिसने पार्थिवला (१८ चेंडूंत ३७) बाद केल्यानंतर मुंबईची धावगती कमी होईल असे वाटले. परंतु, यानंतर बटलर आणि राणा यांचा ‘शो’ सुरू झाला. दोघांनी समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला जबरदस्त बदडून काढले. पहिल्या डावात झालेल्या धुलाईचा वचपा काढताना बटलर-राणा यांनी पंजाबच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. बटलरने ३७ चेंडूंत ७७ धावांचा तडाखा देताना ७ चौकार व ५ षटकारांचा नजराणा पेश केला. दुसरीकडे, राणाने यंदाच्या सत्रातील तिसरे अर्धशतक झळकावताना ३४ चेंडंूत ७ षटकार ठोकताना नाबाद ६२ धावा काढल्या. यासह त्याने ‘आॅरेंज कॅप’वरही कब्जा केला. बटलर परतल्यानंतर राणाने हार्दिक पांड्यासह (४ चेंडूंत नाबाद १५) मुंबईच्या विजयावर शिक्का मारला. 
तत्पूर्वी, पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पंजाबने आमलाच्या शतकी तडाख्याच्या जोरावर आव्हानात्मक मजल मारली. आमलाने जबरदस्त ‘हमला’ करताना ६० चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १०४ धावा कुटल्या. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेदेखील १८ चेंडंूत ४ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा काढल्या. मात्र, बटलर व राणा यांच्या धमाकेदार खेळीमुळे या दोघांची फटकेबाजी व्यर्थ ठरली. 

संक्षिप्त धावफलक :
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ४ बाद १९८ धावा (हाशिम आमला नाबाद १०४, ग्लेन मॅक्सवेल ४०; मिशेल मॅक्क्लेनघन २/४६) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १५.३ षटकांत २ बाद १९९ धावा (जोस बटलर ७७, नितीश राणा नाबाद ६२; मार्कस स्टोइनिस १/२८, मोहित शर्मा १/२९)