हेही नसे थोडके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 08:59 AM2017-07-24T08:59:13+5:302017-07-24T08:59:13+5:30

काही गोष्टी मनाला फार हुरहूर लावून जातात. काल झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतरही मनाला अशीच हुरहुर लागली आहे.

Beware! | हेही नसे थोडके!

हेही नसे थोडके!

Next
>बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत    
 काही गोष्टी मनाला फार हुरहूर लावून जातात. काल झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतरही मनाला अशीच हुरहुर लागली आहे. स्वप्नवत कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारणाऱ्या भारताच्या रणरागिणी  इंग्लंडमधून विश्वचषक आणतील, अशी अपेक्षा होती. त्यांनी यजमान इंग्लंडविरुद्ध झालेल्या फायनलमध्येही कामगिरीत सातत्य राखत जवळपास विश्वविजेतेपद खेचून आणले होते. पण शेवटी जे घडू नये तेच झाले. नशिबाने दगा दिला. खेळाडूंचा संयम सुटला आणि हातात आलेला विश्वचषक निसटला. गेल्या महिनाभरापासून घेतलेल्या कष्टाचे चीज नाही झाले. ज्यांनी ज्यांनी हा सामना पाहिला त्यांचे डोळे पाणावले. देश हळहळला. पण पराभूत होऊनही सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी आणि ज्यांचे क्रिकेटशी फार सौख्य नाही अशा मंडळींकडून महिला संघाने जे प्रेम मिळवले त्याला तोड नाही. हा अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या भारतीय महिला क्रिकेटसाठी विश्वचषकापेक्षाही मोठा विजय आहे. 
 खरंतर विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय संघाला कुणीही विजेतेपदाचा दावेदार मानत नव्हते. अगदी महिला क्रिकेट वर्षानूवर्षे पाहणारेही या संघाकडे संभाव्य विजेता म्हणून पाहत नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना त्यांच्याकडून अपेक्षा असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण मिताली राजच्या धाकड गर्ल्सनी विश्वचषकात जो कारनामा केला तो स्वप्नवत होता. पात्रता फेरीचे दिव्य पार करून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवल्यानंतर त्यांनी पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडला दणका दिला. येथूनच वुमेन्स इन ब्ल्यू चर्चेत आली. मग महिनाभरात काय झाले त्याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. 
कधी नव्हे ते भारतीय महिला क्रिकेट चर्चेत आले. तसे ते आधीही होते. पण त्यावेळी पुरुष संघाच्या तुलनेत महिला क्रिकेटची चर्चा नगण्यच व्हायची. पण यंदाच्या विश्वचषकाने हे चित्र बदलले. मिताली राज आणि झूलन गोस्वामी वगळता बाकीच्या महिला क्रिकेटपटूं प्रसिद्धीच्या झोतात नव्हत्या. यावेळी मात्र स्मृती मंधाना, पूनम राऊत, हरमनप्रीत, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे चर्चेत आल्या. कॉलेजचे कट्टे असोत की लोकलमधील ग्रुप महिला क्रिकेटची कधी नव्हे तितकी चर्चा झाली.  थेट प्रक्षेपित झालेले सामनेही मोठ्या प्रमाणावर पाहिले गेले. सोशल मीडियावरही महिला क्रिकेट ट्रेंडमध्ये होते. चर्चा इतकी झाली की महिला क्रिकेटपटूंच्या दमदार कामगिरीच्या झंझावातात पुरुष संघात प्रशिक्षक पदावरून रंगलेले मानापमान नाट्य झाकोळले गेले.  
 एकूणच संघाने केलेली जबरदस्त कामगिरी आणि त्यांना मिळत असलेला पाठिंबा यामुळे लॉर्ड्सवर नवा इतिहास लिहिला जाणार. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिताली राज विश्वचषक उचलणार असेच वाटत होते. पण शेवटच्या क्षणी निराशा झाली. असो. पण महिला संघ ज्याप्रमाणे खेळला. जो लढाऊ बाणा त्यांनी आपल्या खेळात दाखवला. त्यामुळे सर्वांच्या मनात घर करण्यात त्या यशस्वी ठरल्यात. भारताच्या संदर्भात बघायचे झाले तर क्रिकेट हा पुरुषी खेळ. क्रिकेट खेळणाऱ्या महिला, मुली यांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत नगण्यच. तरीही भारतीय महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठतात हे कौतुकास्पद म्हटले पाहिजे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय महिला क्रिकेटसाठी नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. क्रिकेट भारतात लोकप्रिय आहेच, पण त्यात महिला क्रिकेटपटूंनीही अशीच कामगिरी सातत्याने केल्यास भारतात महिला क्रिकेटही जबरदस्त लोकप्रियता मिळवेल. त्यामुळे मिताली राज आणि तिच्या सहकारी विश्वचषक जिंकूण आणण्यात अपयशी ठरल्या असल्या तरी त्यांनी महिला क्रिकेटमध्ये केलेली क्रांती भारतीय क्रिकेट आणि एकूणच क्रीडाक्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.   

Web Title: Beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.