अया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 10:30 AM2018-05-08T10:30:52+5:302018-05-08T10:30:52+5:30

अया सिसोको प्रथितयश बॉक्सर ते ख्यातनाम लेखिका हा त्यांचा प्रवास थरारक आहे. वर्णभेदाच्या झळांनी पोळलेलं आयुष्य सांभाळत त्यांनी आता आपल्या लेखणीनं वर्णभेदाविरोधी लढाई छेडली आहे..

Aya | अया

अया

googlenewsNext

- कलीम अजीम

वर्णभेदावर जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणणाऱ्या दोन गोष्टी मार्चमध्ये घडल्या. एक म्हणजे अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर भाष्य करणारा ब्लॅक पॅँथर सिनेमा आणि दुसरी म्हणजे ‘नॅशनल जिआॅग्राफिक’ चॅनलनं दिलेली वर्णभेद पोसल्याची कबुली. या दोन्हींवर अजूनही जगभरातल्या सर्व माध्यमांत चर्चा सुरू आहेत. मार्च महिन्यातच जागतिक ‘वर्णभेदविरोधी दिवस’ साजरा झाला. यानिमित्तानं जगभरातल्या माध्यमांनी वर्णभेदावर भाष्य करणा-या काही लेखमाला चालवल्या होत्या. अशाच एका लेखात मला फ्रेंच लेखिका अया सिसोको यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यास मिळाला. गेल्या दहा वर्षांपासून ही ३९ वर्षीय कृष्णवर्णीय महिला वर्णभेदविरोधात लढा देत आहे.
वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर ते प्रथितयश लेखिका असा थक्क करणारा अया सिसोको यांचा प्रवास आहे. अयाचा जन्म होण्यापूर्वी त्यांचे आई-वडील माली सोडून रोजगारासाठी पॅरिसमध्ये आले. अया सहा वर्षांच्या असताना वर्णभेदी हल्ल्यात त्यांचे वडील आणि भावाची हत्या झाली. अशा असहिष्णू वातावरणात आईनं त्यांना वाढवलं. बालपणापासून त्यांनी फ्रान्समध्ये होणारे वर्णद्वेषी हल्ले पाहिले. सूडबुद्धी, बंड आणि विद्रोह जन्मजात असल्यानं त्या आपोआपच बॉक्सिंगकडे वळाल्या. कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी लहानपणीच बॉक्सिंगचं सेल्फ ट्रेनिंग घेतलं. या ट्रेनिंगनंतर वयाच्या आठव्या वर्षी अया पहिल्यांदा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरल्या.

बॉक्सिंगच्या खेळामुळेच कणखर आणि मजबूत झाल्याचं त्या म्हणतात. त्यांना बॉक्सिंगच्या ट्रेनिंगसाठी प्रशिक्षकही मिळत नव्हता; पण खेळाच्या टेक्निकल ट्रेनिंगसाठी प्रशिक्षण गरजेचं होतं, त्यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षकांचे उंबरठे झिजवले. लहान वयापासून त्यांचा बॉक्सिंग प्रवास सुरू झाला. बाराव्या वर्षी त्यांनी फ्रेंच बॉक्सिंगचं विजेतेपद मिळवलं. तीनदा वर्ल्ड चॅम्पियन, दोनदा फ्रेंच बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि एकदा इंग्लिश बॉक्सिंग चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली. अल्पावधीत त्या स्पोर्ट्स सेलिब्रिटी म्हणून प्रस्थापित झाल्या. स्पोर्ट्स करिअर ऐन उमेदीत असताना एक दुर्घटना घडली. २००६ साली दिल्लीत न्यू दिल्ली विरुद्ध यूक्रेनियन अशा एका सामन्यात त्यांना मानेची दुखापत झाली. या दुखण्यातून त्या सावरू शकल्या नाहीत. यशाच्या शिखरावर असताना त्यांना बॉक्सिंग सोडावं लागलं. बॉक्सिंग सुटल्यानं त्या खूप दु:खी झाल्या. यातून बाहेर पडण्यासाठी त्या उच्चशिक्षणाकडे वळल्या.

पॅरिस विद्यापीठातून त्यांनी २०११ साली पॉलिटिकल सायन्सची पदव्युत्तर पदवी मिळवली. डिग्रीनंतर मित्रांच्या सल्ल्यानुसार आपला जीवनप्रवास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ‘सेक्सिज्म’ आणि ‘रेसिज्म’ या दोन गोष्टींना केंद्रबिंदू ठेवत त्यांनी आपली आत्मकथा पूर्ण केली. २०१२ साली उंल्लुक्व नावाचं त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. उंल्लुक्व म्हणजे डिग्निटी. या पुस्तकात त्यांनी युरोपियन राष्ट्रात होत असलेल्या वर्णद्वेषी हल्ल्याबाबत चर्चा तर केलीच आहे, पण एक स्पोर्ट्स सेलिब्रिटी म्हणून वावरत असताना कृष्णवर्णीय म्हणून त्यांची झालेली हेटाळणीही अधोरेखित केली आहे. लिंगभाव आधारित भेदभाव पुरुष सहकारी कसा करतात, याची अनेक धक्कादायक उदाहरणं त्यांनी पुस्तकात दिली आहेत. त्यांच्या या आत्मचरित्रानं स्पोर्ट्स जगतात खळबळ उडाली. यांच्या या आत्मचरित्रावर दोन सिनेमे तयार झाले आहेत. सिनेमानंतर त्याच्या या लढ्याला फ्रान्समध्ये व्यापक स्वरुप प्राप्त झालं.
अया सिसोकोंना आपला हा जीवनप्रवास एका काल्पनिक कथानकासारखा वाटतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी बीबीसीच्या मुलाखतीत दिलीय. ‘हा प्रवास आठवताना मला वेदना होतात, त्यामुळे मी तो आठवत नाही’ असा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला. शालेय अभ्यासक्र मात त्यांचं आत्मचरित्र लावल्याबद्दल त्या आनंद व्यक्त करतात. ‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी जगले, वर्णभेदी हल्ल्यामुळे आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीत खचून न जाता, त्याच ताकदीनं मी उभी राहिले, आईचा विरोध असतानादेखील मी बॉक्सिंग शिकून त्यात जागतिक पातळीवर यश मिळवलं. ही माझी कथा शालेय मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल, त्यातून अनेकजण वर्णद्वेषाला सामोरं जाण्याची मानसिक तयारी करतील, त्याविरोधात लढा देतील’ अशी आजही त्यांना खातरी वाटते.
(लेखक मुक्तपत्रकार आहेत. kalimazim2@gmail.com )

Web Title: Aya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.