पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लावणारे वर्ष, घरफोड्यांनी हादरले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 08:00 AM2017-12-31T08:00:29+5:302017-12-31T08:00:40+5:30

पोलिसांना २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वर्षभरात विविध प्रकारचे सुमारे तीन हजार ८०० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी जुईनगर येथील बडोदा बँक लुटीचा गुन्हा देशभर चर्चेचा विषय बनला होता.

 The year of the police felicitation, the burglar is a city | पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लावणारे वर्ष, घरफोड्यांनी हादरले शहर

पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लावणारे वर्ष, घरफोड्यांनी हादरले शहर

googlenewsNext

- सुर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : पोलिसांना २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वर्षभरात विविध प्रकारचे सुमारे तीन हजार ८०० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी जुईनगर येथील बडोदा बँक लुटीचा गुन्हा देशभर चर्चेचा विषय बनला होता.
तपासकामात पोलिसांना चक्रावून सोडतील, असे गुन्हे सरत्या वर्षात पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात घडले आहेत. सराईत गुन्हेगारांनी कसलाही ठोस पुरावा मागे न सोडता केलेल्या या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात जुईनगर येथील बडोदा बँकेची घरफोडी देशभर चर्चेचा विषय बनली. भुयार खोदून बँक लुटण्याचा देशातला दुसरा व राज्यातला पहिलाच गुन्हा होता. कसलाही ठोस पुरावा मागे नसताना केवळ सीसीटीव्ही व इतर काही तंत्रज्ञानाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत मुख्य सूत्रधाराला पकडून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. या गुन्ह्याच्या काही दिवसअगोदरच वाशीत व्यापाºयाच्या घरी जबरी दरोडा पडला होता. तपासाअंती पोलिसाची पत्नी अनिता म्हसाणे गुन्ह्याची सूत्रधार असल्याचे समोर आले. तर काही दिवसांतच तिचा पोलीस पती मुकुंद म्हसाणे यालाही फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. तर एपीएमसीमधून ९० लाखांचे तर कळंबोली येथून चार कोटींचे सिगारेटचोरीचे दोन गुन्हे उघड करण्याचे आव्हान असतानाही ते गुन्हे उघड केले.
मे महिन्यात रबाळे एमआयडीसी हद्दीत गटारात शिर व पाय नसलेले प्रियांका गुरव या नवविवाहितेचे धड सापडले होते. प्रेमसंबंधातून लग्नाला भाग पाडल्याने सासरच्या व्यक्तींनीच लग्नाच्या चौथ्या दिवशीच तिची हत्या करून तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. त्यापैकी रबाळे एमआयडीसीमध्ये टाकलेल्या धडाच्या मानेवरील टॅटोवरून पोलिसांनी अत्यंत शिताफीने मृतदेहाची ओळख पटवून सासरच्यांना अटक केली होती. तर मे महिन्यात दारावे येथील मयूरा ज्वेलर्सची भिंत फोडून सुमारे ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. हा गुन्हा अवघ्या रेल्वेच्या तिकिटावरून उघड करून पोलिसांनी टोळीला अटक केली. ज्वेलर्सच्या मागचे घर भाड्याने घेऊन हा दरोडा टाकण्यात आला होता. ५५ लाखांच्या खंडणीसाठी लहान मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार तळोजा येथे घडला होता. या गुन्ह्यात चिमुरड्याच्या जीविताला धोका निर्माण झाला होता; परंतु पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुलाची सुखरूप सुटका करून गुन्हेगारांना अटक केली होती.
बहुतांश गुन्हे केवळ तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांना उघड करावे लागले आहेत. त्याकरिता गुन्हे मध्यवर्ती शाखेच्या पथकाने दाखवलेले कौशल्य गुन्हे उघड होण्यास महत्त्वाचे ठरले आहे. तर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवार्इंच्या माध्यमातून अमली पदार्थविक्रेत्यांचे कंबरडे मोडून काढले आहे. वर्षभरात दहाहून अधिक कारवाया करून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त करून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

५० जणांवर मोक्का
सरत्या वर्षात आयुक्तालय क्षेत्रामध्ये घडलेल्या सुमारे तीन हजार ८०० गुन्ह्यांपैकी सुमारे २५०० गुन्हे परिमंडळ एकमध्ये घडले आहेत. त्यामध्ये वाहनचोरी, हत्या, दरोडे, खंडणी, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे; परंतु चालू वर्षात पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, तसेच मोक्काच्या केलेल्या कारवायांमुळे २०१६च्या तुलनेत २०१७मध्ये महत्त्वाच्या गुन्ह्यांत घट झालेली आहे. तर उघड केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण ६४ टक्के इतके आहे. सरत्या वर्षात सात टोळ्यांमधील ५०हून अधिक गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई झालेली आहे.

जेएनपीटीवर सायबर हल्ला
जेएनपीटीमधील गेटवे टर्मिनल्स इंडियाची संगणक प्रणाली जूनला हॅक करण्यात आली होती. कंपनीचे सुमारे २७० संगणक व लॅपटॉप व्हायरसमुक्त करण्यासाठी हॅकरने खंडणी मागितली होती. अशा प्रकारे खंडणीचा हा शहरातील पहिलाच गुन्हा आहे. त्यानंतर काही दिवसांतच नवी मुंबई पोलिसांची वेबसाइट दोनदा हॅक झाली होती.

परिमंडळ एक मध्ये वर्षभरात दरोड्याच्या तीन मोठ्या घटना घडल्या असून, त्या सर्वांची उकल करण्यात आलेली आहे.

घरफोडीचे २३४ गुन्हे घडले असून, त्यापैकी ६६ गुन्हे दिवसा तर १८८ रात्री घडले आहेत.

हत्येचे २४ गुन्हे घडले असून, त्यापैकी २३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

वाहनचोरी
२०१७ मध्ये ३५६
२०१६मध्ये ४८०
घरफोडी
२०१७ मध्ये २३४
२०१६ मध्ये ३२०
प्राणांतिक अपघात
२०१७ मध्ये १०८
१०१६ मध्ये ११६

Web Title:  The year of the police felicitation, the burglar is a city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.