शासकीय इमारतींचे काम अपूर्णावस्थेत, प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:35 AM2019-02-14T03:35:54+5:302019-02-14T03:39:03+5:30

पनवेलमधील नवीन शासकीय इमारतींची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहेत. न्यायालयाची इमारत वगळता इतर कामे पूर्णत्वास आली नाहीत. निधीचा तुटवडा, प्रशासकीय अनास्था तसेच इतर तांत्रिक गोष्टींचा याला फटका बसला आहे.

In the workplace of government buildings, in the absence of administrative machinery, ignore them | शासकीय इमारतींचे काम अपूर्णावस्थेत, प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष

शासकीय इमारतींचे काम अपूर्णावस्थेत, प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष

Next

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेलमधील नवीन शासकीय इमारतींची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहेत. न्यायालयाची इमारत वगळता इतर कामे पूर्णत्वास आली नाहीत. निधीचा तुटवडा, प्रशासकीय अनास्था तसेच इतर तांत्रिक गोष्टींचा याला फटका बसला आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहापाठीमागे २०११ मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले, त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधण्याची मागणी केली. त्यानुसार २ फेब्रुवारी २०११ रोजी ट्रामा केअर युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळाली. या कामाचे अंदाजपत्रक १६ कोटी ९१ लाख ९६ हजारांवर गेले. मंजुरी मान्यता यामध्ये बराच कालावधी लोटला. त्याचबरोबर अनेकदा निधीचीही कमतरता पडली. आता इमारती बांधून तयार झाल्या असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अद्याप येथे रुग्णसेवा सुरू करण्यात आली नाही. पनवेल तहसील, कोषागार, वनविभाग, निबंधक आणि पोलीस ठाणे एका छताखाली आणण्याकरिता प्रशासकीय भवनाचे काम हाती घेण्यात आले आहे, याकरिता ९ कोटी ८१ लाख ८० हजार ५०० इतका खर्च अपेक्षित आहे. एकूण ४२४७.७० चौ.मी क्षेत्रफळाची तीन मजली इमारत बांधण्याचे काम अद्याप सुरू आहे. कायदेशीर त्याचबरोबर तांत्रिक अडथळ्यामुळे प्रशासकीय भवन तयार झालेले नाही. पनवेलमध्ये मोडकळीस आलेले तीन शासकीय धान्य गोदाम जमीनदोस्त करून एकूण ८७ गुंठे जागेवर ३००० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्याचे काम सुरू आहे; परंतु त्या गोदामाचे कामसुद्धा पूर्ण झाले नाही. पुरवठा विभागाला भाड्याकरिता लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.

पनवेल आरटीओची जागा बदलली
स्टील मार्केटमध्ये भाडोत्री जागेवर असलेले पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाची करंजाडे या ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाची इमारत उभारण्याचा प्रस्ताव होता. २३७६३ चौरस मीटरचा भूखंड आरटीओ कार्यालयाला देण्यात आला होता. २.५ हेक्टर क्षेत्रावर ३५९० इतके बांधकाम करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, येथे कॉरिडोअर प्रकल्प येणार असल्याने आता पर्यायी जागा तळोजा येथे देण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाची स्थापना होऊन नऊ वर्षे झाली तरी अद्याप स्वत:चे कार्यालय झाले नाही.

नऊ वर्षे बांधकाम रखडले
पनवेल तालुका पंचायत समितीची जुनी इमारत जमीनदोस्त करून त्या जागेवर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर नूतन वास्तूचे बांधकाम २०१० साली हाती घेण्यात आले आहे. प्रशासकीय भवनबरोबर या ठिकाणी व्यापारी संकुलही उभारण्यात येत आहे. त्यातील गाळे संबंधित बिल्डरला देण्यात आले असून तो त्याची विक्र ी करणार असल्याचे करारात नमूद आहे; परंतु गेल्या नऊ वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही

उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय गोदामाचे काम १०० टक्के झालेले आहे. ते १५ दिवसांच्या आत अनुक्र मे आरोग्य, पुरवठा विभागाला हस्तांतर करण्यात येतील. प्रशासकीय भवनाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. तेही लवकरच पूर्ण होईल.
- एस.एम. कांबळे,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम

पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम हे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, याकरिता आम्ही त्या विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. जेणेकरून आमची गैरसोय होणार नाही.
- डी. एन. तेटगुरे,
गटविकास अधिकारी, पनवेल

सिडकोने आरटीओ कार्यालयासाठी करंजाडे येथे जागा दिली होती, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, येथे कॉरिडोअर प्रोजेक्ट येणार असल्याने आम्हाला तळोजा येथे पर्यायी जागा देण्यात आली आहे, त्यामुळे आता करंजाडे ऐवजी तळोजात आरटीओ कार्यालय होईल.
- लक्ष्मण दराडे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल.

Web Title: In the workplace of government buildings, in the absence of administrative machinery, ignore them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.