आठवडे बाजारामागील ‘अर्थ’कारण; स्थानिकांच्या विरोधाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:45 AM2018-09-20T04:45:34+5:302018-09-20T04:46:01+5:30

शहराबाहेरील फेरीवाल्यांचा शिरकाव; महापालिकेकडून कारवाईची औपचारिकता

Week for 'market' reasons; Kerichati basket in spite of local opposition | आठवडे बाजारामागील ‘अर्थ’कारण; स्थानिकांच्या विरोधाला केराची टोपली

आठवडे बाजारामागील ‘अर्थ’कारण; स्थानिकांच्या विरोधाला केराची टोपली

Next

- कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : आठवडे बाजारावरून सध्या शहरातील राजकारण पेटले आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांच्यात या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपा आठवडे बाजार बंद करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. तर आठवडे बाजाराला आपला आक्षेप नसून, बाहेरून येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विक्रेत्यांना आपला विरोध असल्याची भूमिका मंदा म्हात्रे यांनी मांडली आहे. हीच भूमिका आपण दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्यापाºयांच्या बैठकीत मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुळात शहरातील आठवडे बाजार बंद करण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. कारण, या आठवडे बाजारात स्थानिकापेक्षा मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, कुर्ला आणि मुंब्रा येथून आलेल्या फेरीवाल्यांचा अधिक भरणा असतो. विशेष म्हणजे, यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले आहे. याचाच परिणाम म्हणून आठवडे बाजारात पाकीटमारी, चेनस्नॅचिंग, मारामारी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्याशिवाय आठवडे बाजाराच्या दिवशी स्थानिक रहिवासी नाहक वेठीस धरले जातात. वाहतुकीचा उडणारा बोजवारा ही तर वेगळीच समस्या आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सायबर सिटीच्या गावागावांत भरणारे आठवडे बाजार बंद करावेत, अशी जुनी मागणी आहे. महापालिकेच्या सभागृहात गळा काढून ओरडणारे लोकप्रतिनिधी आपल्या विभागातील आठवडे बाजाराविषयी मात्र अर्थपूर्ण चुप्पी साधताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, या आठवडे बाजारामागे मोठे ‘अर्थ’कारण दडले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या आश्रयाशिवाय हे बाजार भरणार नाहीत, कारण अनेक ठिकाणी नगरसेवकांचे बगलबच्चेच फेरीवाल्यांकडून हफ्ते वसूल करताना दिसतात. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांच्या अर्थपूर्ण युतीमुळेच आठवडे बाजाराचे भूत मानगुटीवर बसले आहे.
महापालिकेकडून केवळ कारवाईचा फार्स रचला जातो. थातूरमातूर कारवाई करून, वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधाला घाबरून अधिकारीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी रविवारी बोलावलेल्या व्यापाºयांच्या बैठकीत आठवडे बाजाराबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या आठवडे बाजारात स्थानिक फेरीवाल्यांना वाव मिळत नसेल, तर या संदर्भात ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे मत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे, तर भाजपा नवी मुंबईतील आठवडे बाजार बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप शिवसेनेचे उपशहरप्रमुख व कामगारनेते प्रफुल्ल म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे आठवडे बाजारच्या मुद्द्यावरून येत्या काळात शिवसेना आणि भाजपात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आठवडे बाजाराचा सर्वाधिक फटका स्थानिक रहिवाशांना बसतो. यासंदर्भात त्या त्या ठिकाणच्या रहिवाशांनी महापालिकेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने ठिकठिकाणी आठवडे बाजार भरविले जाऊ नयेत, अशा आशयाचे फलक लावले आहेत; परंतु त्यानंतरसुद्धा हे बाजार भरत आहेत.

घणसोलीत गंभीर अवस्था
घणसोलीमधील स्थिती सर्वात गंभीर आहे. प्रत्येक रविवारी नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालयासमोरील रस्ता, दगडू पाटील चौक, स्वातंत्र्य सैनिक चौक, डी-मार्ट परिसर, सद्गुुरू हॉस्पिटल रोड, साई सदानंद नगर परिसरामध्ये शेकडो फेरीवाले जागा अडवत आहेत. महापालिकेच्या कारवाईला घाबरून काही फेरीवाले रस्त्यालगत असलेल्या संबंधित जागामालकाचा शोध घेतात, त्यामुळे जागेचे मालक प्रत्येक रविवारी जागा उपलब्ध करून भाडे घेतात आणि प्रत्येकी १०० रु पये भुईभाडे आकारले जाते. घणसोलीप्रमाणेच कोपरखैरणे, ऐरोली, सानपाडा, तुर्भे, बेलापूर आदी भागांत नियमित आठवडे बाजार भरत आहे.

माजी आयुक्तांनी केली होती कारवाई
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आठवडे बाजारावर कारवाईचा आसूड उगारला होता. विभाग अधिकाºयांना सक्त ताकीद दिली होती, त्यामुळे आठवडे बाजाराला काही प्रमाणात आळा बसला होता; परंतु त्यांची बदली होताच, पुढच्याच आठवड्यात हे बाजार पुन्हा भरू लागले आहेत.

Web Title: Week for 'market' reasons; Kerichati basket in spite of local opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.