पनवेलमध्ये पाण्याची गळती सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:31 PM2018-10-21T23:31:19+5:302018-10-21T23:31:28+5:30

पनवेलच्या काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Water leakage in Panvel | पनवेलमध्ये पाण्याची गळती सुरूच

पनवेलमध्ये पाण्याची गळती सुरूच

Next

- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेलच्या काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचवेळी एमजेपीच्या जलवाहिनीला गळती सुरूच असल्याचे दिसून आले आहे. एकूणच भीषण पाणीटंचाईत सुद्धा पाण्याचा अपव्यय सुरूच असल्याने पनवेलकरांनी संताप व्यक्त केला आहे.
एमजेपीची भोकरपाडा ते कळंबोली दरम्यानची जलवाहिनी जुनी व जीर्ण झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागते, तर काही ठिकाणी झोपडीधारक व काही व्यावसायिक जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी करतात. विशेष म्हणजे जलवाहिनीला एकदा छिद्र पाडले की, त्यातून सतत पाणी वाहत असते. ती दुरुस्त करण्याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही तत्परता दाखविली जात नाही. याचा परिणाम म्हणून दरदिवशी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. शहरात एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे पाण्याचा वारेमाप अपव्यय होत असल्याचे चित्र पनवेलमध्ये पाहावयास मिळत आहे. जीर्ण व जुन्या झालेल्या एमजेपीची जलवाहिन्या बदलण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या. मात्र कार्यवाही काहीच झाली नाही. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेवून जलवाहिनी बदलण्याची गरज का आहे, हे सुध्दा त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याचा परिणाम म्हणून जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. असे असले तरी सध्या ज्या ठिकाणी नियमित गळती होते त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे मत आहे. एकीकडे पाणीटंचाई आहे, तर दुसरीकडे पाण्याची गळती सुरू आहे. संबंधित प्रशासनाच्या गैरकारभाराचे हे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया सह्याद्री सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबनराव पवार यांनी व्यक्त केली आहे.
>जलवाहिनीला गळती लागलेली ठिकाणे
खांदा वसाहत, आसुडगाव, कळंबोली द्रुत महामार्गाच्या पुलाखाली एमजेपीच्या जलवाहिनीला बारा महिने गळती लागलेली असते. आजमितीससुद्धा याच ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जात आहे. नवीन पनवेल आणि कळंबोलीत काही ठिकाणी पिण्याकरिता पाणी नाही. हंडाभर पाण्यासाठी कळंबोलीत वाद होत आहेत.
वाय पॉइंट ते कळंबोली या दरम्यानची जलवाहिनी त्वरित बदलण्यात यावी अशी मागणी केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होईल, असा विश्वास वाटतो.
- संतोष शेट्टी, नगरसेवक,पनवेल महापालिका

Web Title: Water leakage in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.