मतदार निघाला गावाला, तरुणाईकडून पिकनिकचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:05 AM2019-04-26T01:05:54+5:302019-04-26T06:53:28+5:30

सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने शहरातील अनेक मतदारांनी गावचा रस्ता धरला आहे. तर युवा मतदारांनी पिकनिकचे बेत आखले आहेत.

Voters leave village, planning for picnic from youthfulness | मतदार निघाला गावाला, तरुणाईकडून पिकनिकचे नियोजन

मतदार निघाला गावाला, तरुणाईकडून पिकनिकचे नियोजन

Next

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात सोमवार, २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी या मतदारसंघातील प्रचार थंडावणार आहे. शनिवार आणि रविवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. तर सोमवारी मतदानासाठी राज्य सरकारने अगोदरच सुट्टी जाहीर केली आहे. सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने शहरातील अनेक मतदारांनी गावचा रस्ता धरला आहे. तर युवा मतदारांनी पिकनिकचे बेत आखले आहेत. मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करण्याच्या मानसिकतेचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात अनुक्रमे ४,४८,६८१ व ३,७६४८५ मतदार आहेत. नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. या शहरात विविध प्रांतासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील लोक राहतात. शहरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. या आयटी क्षेत्रात काम करणारा मोठा वर्ग इतर राज्यातून आलेला आहे. यात बहुतांशी उच्चशिक्षित युवावर्ग असल्याने त्यांना निवडणूक व मतदान या प्रक्रियेचा नेहमीच तिटकारा राहिला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारा हा घटक प्रत्यक्षात मतदान करायला बाहेर पडत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने या वेळी कंबर कसली आहे. विविध स्तरावर मतदारांचे प्रबोधन केले जात आहे. विशेषत: तरुण व नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी आवाहन केले जात आहे. निवडणूक आयोगाचे हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात, हे प्रत्यक्षात मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. असे असले तरी सलग तीन दिवस लागून आलेल्या सुट्टी मतदान प्रक्रियेचे गांभीर्य नसलेल्या चंगळवादी घटकांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी सोमवारपर्यंत आउटिंगचे प्लान केले आहेत.

Web Title: Voters leave village, planning for picnic from youthfulness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.