Tribal power will reach power; Work on Mahavitaran started | आदिवासी पाड्यावर वीज पोहोचणार; महावितरणकडून काम सुरू
आदिवासी पाड्यावर वीज पोहोचणार; महावितरणकडून काम सुरू

- वैभव गायकर

पनवेल : देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघºयाची वाडी व सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात लक्ष वेधले. यानंतर ‘लोकमत’ने या विषयावर आवाज उठविल्यानंतर या विषयाची राज्यभर चर्चा झाली होती. यानंतर पंडित दीनदयाळ ग्रामीण विद्युत योजनेअंतर्गत आदिवासी पाड्यापर्यंत वीज पोहोचविण्याचे काम सुरू झाले असून, लवकरच गावात वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग-९ मध्ये वाघºयाची वाडी, सागाची वाडीचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रो प्रकल्पांच्या जवळच्या डोंगरावर असलेल्या या पाड्यांपर्यंत वीज, रस्ते व प्राथमिक सुविधाही नाहीत. महानगरपालिकेमध्ये या पाड्यांचा समावेश झाल्यानंतर स्थानिक नगरसेवक महादेव मधे यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये महापालिका सभागृहात या विषयावर लक्ष वेधले. ‘आमच्या गावात वीज कधी पोहोचणार?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर ‘लोकमत’ने डोंगरावरील दोन्ही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तेथील वास्तव स्थिती समोर आणली होती. खुद्द भाजपा नगरसेवकाच्या घरामध्येही अंधार असून, त्यांची आई अंधारात स्वयंपाक करत असल्याचे वास्तव बातमीच्या माध्यमातून मांडले होते. वाघºयाची वाडी हा भाग पनवेल तालुक्यातील टेंभोडे परिसरात आहे. या ठिकाणच्या मार्गापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या उंचीवर डोंगरमाथ्यावर ही वाडी वसली आहे. सागाची वाडी व वाघºयाची वाडी, अशा अनुक्र मे या दोन वाड्या या डोंगरमाथ्यावर आहेत. पनवेलचा विकास झपाट्याने होत असताना या वाड्यावर मूलभूत समस्यांची वानवा आहे. दोन्ही वाड्यांत वीज, पाणी पोहोचलेले नाही. डोळ्यांदेखत परिसराचा झालेला कायापालट आणि एकीकडे प्राथमिक सुविधांचाही अभाव हा विरोधाभास पाहावयास मिळत होता.
आदिवासी पाड्यावर वीज पोहोचविण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. जिल्हा नियोजन फंडाच्या निधी अभावामुळे या ठिकाणी वीज पोहोचण्यास उशीर झाला होता. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण विद्युत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला गती मिळाली. आदिवासी वाड्यांना सुमारे १०० केव्हीएचा वीजपुरवठा मिळणार आहे. या ठिकाणी वीज पोहोचविण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून सुमारे ८५ ते १०० पोल उभारण्यात येत आहेत. डोंगररांगामुळे महावितरणला हे पोल उंचावर नेण्यास अडचणी निर्माण होत आहेत, याकरिता सुमारे ७५ लाखांच्या आसपास खर्च करण्यात येणार आहे.

आदिवासींची दिवाळी प्रकाशमय
पाड्यांवर वीज येणार असल्यामुळे नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंतचे सर्व सण, दिवाळीही अंधारातच साजरी करावी लागत होती; परंतु या वर्षीच्या दिवाळीच्या अगोदरच गावात वीजपुरवठा करण्यासाठी खांब रोवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनानेही युद्धपातळीवर काम सुरू केले असून, गावात वीज आली की ग्रामस्थांसाठी खºया अर्थाने दिवाळी असणार आहे.

‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश
वाघºयाची व सागाची वाडी या आदिवासी वस्तीमधील विजेच्या समस्येवर ‘लोकमत’ने गतवर्षी आवाज उठविला होता. डोंगरावरील पाड्यावर जाऊन तेथील वास्तव स्थिती समोर आणली होती. या वृत्ताची राज्यभर चर्चा झाली होती. यानंतर प्रशासनानेही वीजपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला व प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे.

वाघºयाच्या वाडीवर वीजपुरवठा करण्याच्या कामाला सुरु वात केली आहे. उंचीवर, डोंगरावर पोल उभारण्यास अडचणी निर्माण होत आहेत, तरीदेखील १० ते १५ दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
- माणिक राठोड, अधिकारी, महावितरण पनवेल

एवढ्या वर्षांनंतर पाड्यात वीज येणार आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील वेळोवेळी पाठपुरावा केला असून, त्यांच्या पाठपुराव्यानंतर हे शक्य झाले आहे.
- महादेव मधे, नगरसेवक, वाघºयाची वाडी


Web Title:  Tribal power will reach power; Work on Mahavitaran started
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.