महापौर बंगल्याची शोकांतिका , देखभाल दुरूस्तीवरील लाखो रूपयांचा खर्च व्यथ

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:29am

महापौर बंगला हे शहराचे वैभव असते; परंतु नवी मुंबईमध्ये मात्र महापौर बंगल्याला शोकांतिकेचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : महापौर बंगला हे शहराचे वैभव असते; परंतु नवी मुंबईमध्ये मात्र महापौर बंगल्याला शोकांतिकेचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. पारसिक हिलवरील या वास्तूचा महापौरांना वापरच करता येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत असून, विरोधी पक्षासह दक्ष नागरिकांकडून याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे महापालिकेचा कारभार सांभाळणाºया सुधाकर सोनावणे यांनी पदमुक्त होण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पालिकेच्या कँटीनमध्ये स्रेहभोजनाचे आयोजन केले होते. शहराच्या प्रमुख नागरिकाला संवाद साधण्यासाठी, चर्चा करण्यासाठी चक्क कँटीनचा आधार घेतल्यामुळे शहरभर नाराजीचा स्वर उमटू लागला आहे. मुख्यालयापासून जवळच पारसिक हिल टेकडीवर महापौर बंगला आहे. तेथे स्रेहभोजन ठेवणे शक्य होते. वास्तविक महापौरांनी आयोजित केलेल्या बैठका, मेजवान्या बंगल्यावर होणे अपेक्षित असते; परंतु नवी मुंबईमध्ये दुर्दैवाने महापौरांना त्यांच्या निवासस्थानाचा वापरच करता येत नाही. सुधाकर सोनावणे यांनी अडीच वर्षे त्यांच्या झोपडपट्टीमधील घरामध्येच वास्तव्य केले. प्रभागातील जनतेला सहज भेटता यावे, यासाठी मूळ घरीच वास्तव्य केल्याचे ते सांगत असले तरी प्रत्यक्षात महापौरांना त्यांच्या निवासस्थानाचा वापर केला जाऊ दिला जात नसल्याचे वास्तव आहे. यापूर्वीच्या महापौर मनीषा भोईर व अंजनी भोईर याही त्यांच्या मूळ गावातील घरामध्ये वास्तव्य करत होत्या. आतापर्यंत संजीव नाईक व सागर नाईक या दोन्ही महापौरांनीच निवासस्थानाचा प्रत्यक्ष वापर केला आहे. नाईक परिवाराशिवाय इतर कोणत्याच महापौरांना महापौर निवासस्थानाचे दरवाजे कधीच खुले नसल्याचे चित्र आतापर्यंत पाहावयास मिळाले आहे. नवी मुंबईचा समावेश देशातील श्रीमंत महापालिकांमध्ये केला जातो. महापालिकेच्या नावलौकिकाला साजेल, असे भव्य मुख्यालय पामबिच रोडवर उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पालिकेची स्थापना झाल्यानंतर पारसिक हिल टेकडीवर भव्य महापौर बंगल्याचीही यापूर्वीच उभारणी करण्यात आली आहे. महापौरांना शहराच्या विकासाचे नियोजन करताना मुख्यालयापासून जवळ निवासस्थान असावे, हा त्यामागे हेतू होता. महापौरांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही निवासस्थान पाहून शहराच्या वैभवाची ओळख व्हावी, अशा दृष्टिकोनातून बंगल्याची रचना करण्यात आली आहे. आतापर्यंत आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत, शिवराम पाटील यांनी याविषयी आवाज उठविला होता. महापौर बंगल्यावर कॅमेरे बसविण्यात यावेत. या बंगल्याचा नक्की कोण वापर करतो, याची माहिती जाहीर करा, अशी मागणीही विरोधीपक्षाने अनेक वेळा केली आहे. त्यानंतरही महापौरांना निवासस्थानाचा वापर करता आलेला नसून, नवीन महापौरांना तरी त्यांचे हक्काचे निवासस्थान वापरता येणार का नाही, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. आकर्षक रोषणाई दिवाळीमध्ये महापौर बंगल्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. पारसिक हिलवर रात्री फिरण्यासाठी जाणाºया नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जात होते. येथील उद्यानामध्ये फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सुरक्षारक्षकांना महापौर राहण्यासाठी आले आहेत का? याविषयी विचारणा केली असता, नाही, असेच सांगण्यात आले. महापौरांचे वास्तव्य नसताना विनाकारण रोषणाई कशासाठी करण्यात आली, अशी विचारणा नागरिकांनी केली आहे. फक्त नाईक परिवाराकडूनच वापर महापौर बंगल्याची उभारणी झाल्यापासून आतापर्यंत संजीव नाईक व सागर नाईक महापौर असताना त्यांच्याकडून महापौर बंगल्याचा वापर केला जात होता. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच महापौरांना त्याचा वापर करता आला नाही. यापूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिवाळी व इतर महत्त्वाच्या वेळी महापौर बंगल्यावर स्रेहभोजन आयोजित केले जात होते. अनेक महत्त्वाच्या बैठका येथे होत होत्या; पण आता मात्र महापौरांकडून त्याचा वापर केला जात नाही. विद्यमान महापौरांनी तरी पूर्ववत वापर करावा, अशी अपेक्षा केली जात आहे. खर्चाचा तपशील मागविला महापौर बंगल्यावर कोणीही वास्तव्य करत नसले, तरी वीजबिल, साफसफाई व इतर देखभालीवर प्रत्येक महिन्याला लाखो रूपये खर्च होत आहेत. २४ तास सुरक्षारक्षक ठेवावे लागत आहेत. महापौरांकडून वापर होत नसलेल्या या बंगल्याचा नक्की वापर कोण करतो व बांधकामापासून ते देखभालीवर नक्की किती खर्च झाला, याविषयी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तपशील विचारला असून, याविषयी सर्व माहिती जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

संबंधित

नेरुळमधील अतिक्रमणांवर सिडकोची पुन्हा कारवाई
नवी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम होणार, ४६ डॉक्टर्स उपलब्ध होणार
विहिरींच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
सुपरस्पेशालिटी उपचारांचा अहवाल सादर करा; लोकप्रतिनिधींची मागणी
कर्ज परतफेडीचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळला

नवी मुंबई कडून आणखी

सिडकोच्या भूखंडांची कोटीची उड्डाणे
बेकायदा झोपड्यांवर कारवाई; घणसोलीत महापालिका, सिडकोची संयुक्त मोहीम
पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार
कर्नाळा अभयारण्यात लवकरच इको टुरिझम
‘बीपीसीएल’ कामगारांचे १२ तास कामबंद आंदोलन

आणखी वाचा