Shops at the city for the month of Kite festival, from 2 rupees to thousand rupees kites | पतंगमहोत्सवानिमित्त शहरातील दुकाने सजली, २ रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग

- प्राची सोनवणे

नवी मुंबई : मकर संक्रांत जवळ आल्याने सर्वत्र पतंगांची धूम दिसत आहे. वेगवेगळे पतंग बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून, दोन रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध आहेत. एकीकडे बच्चे कंपनी, तरुणाई पतंग उडवून काटाकाटीच्या तयारीत आहेत, तर मांजामुळे पक्षी जखमी होत असल्याने प्राणिमित्रांनी पतंग उडवू नये, याबाबत जनजागृती चालवली आहे.
नवी मुंबईत ठिकठिकाणी पतंगविक्रीचे स्टॉल लागले आहेत. त्यात विविध पतंग पाहायला मिळत आहेत. दोन, पाच रुपयांपासून ते अडीचशे, हजार रुपयांपर्यंतचे पतंग असून, ते घेण्यासाठी गर्दी होत आहे. वेगवेगळे आकार, रंगांमध्ये तसेच स्टाइलमध्ये पंतग आहेत. हिरॉइन्सचे फोटो असलेले, संदेश असलेले पतंगही दिसत असून, २० ते १५० रुपयांपर्यंतच्या पतंगांना जास्त मागणी आहे. तर महागडे पतंग काही ठरावीक लोकच विकत घेत असल्याचे दिसत आहे. अनेक लोक रात्रीच्या वेळेस पतंगांना छोटे कंदील बांधून ते आकाशात उडवतात. असे छोटे कंदीलही विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. पतंगांची विक्र ी मोठ्या प्रमाणात होत असल्याने विक्रेत्यांना या सीझनमध्ये मोठा फायदा होतो. पतंग उडविण्याची स्पर्धा आतापासूनच लागली आहे. तर शहरात काही ठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पतंगांमध्येही यंदा मोदींची क्रेझ पाहायला मिळत असून, याचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.
मकर संक्र ांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधगिरी बाळगावी, तसेच विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. संक्र ांतीनिमित्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र, पतंग उडविताना उत्साहाच्या भरात काळजी घेतली जात नाही आणि अपघातांना निमंत्रण मिळते. शहरासह विद्युत वितरणासाठी लघु व उच्चदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले आणि तरुणही वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेक वेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरुण व लहान मुले, असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. मांजावर धातूमिश्रीत रसायनांचे आवरण असल्याने वीज तारांच्या संपर्कात येताच, या मांजात वीज प्रवाहित होऊ शकते. त्यातून दुर्घटनेसह वीज वितरण यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग जीवाला धोकादायक ठरतो. त्यामुळे पतंग उडविताना काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.


Web Title: Shops at the city for the month of Kite festival, from 2 rupees to thousand rupees kites
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.