ज्येष्ठ नागरिक भार नसून देशाची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:49 AM2018-04-23T03:49:07+5:302018-04-23T03:49:07+5:30

सशक्त समाजासाठी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय महत्त्वाची असून ती नष्ट होता कामा नये.

Senior citizen's burden is not the property but the country's wealth | ज्येष्ठ नागरिक भार नसून देशाची संपत्ती

ज्येष्ठ नागरिक भार नसून देशाची संपत्ती

Next

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अनेक आहेत. त्यांना सुविधा कमी मिळाल्या तरी चालतील; पण त्यांना खरी गरज आधाराची आहे. कारण, ज्येष्ठ नागरिक हे भार नसून ते देशाची संपत्ती आहेत. त्या अनुषंगाने त्यांना जपले पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.
‘लोकमत’ आणि श्री गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामास्वामी एन. उपस्थित होते. या वेळी सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गील, माजी पोलीस आयुक्त रामराव वाघ, हास्य कवी अशोक नायगावकर, कार्यक्रमाच्या निमंत्रिका आमदार मंदा म्हात्रे आणि ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चापके उपस्थित होते.
सशक्त समाजासाठी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय महत्त्वाची असून ती नष्ट होता कामा नये. कारण संयुक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांना मानाचे स्थान असते. शासनाच्या कितीही महत्त्वाच्या योजना असल्या तरीदेखील त्या मूळ लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. नवी मुंबईत तीन नवीन विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येत असून, यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी या वेळी दिली.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच १६ ज्येष्ठ नागरिक संघाचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिकांविषयी आपली तळमळ व्यक्त केली. येत्या काळात या घटकांसाठीच अधिक काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठांनी स्वत:ला कधीच एकटे समजू नका, असा मोलाचा सल्ला देतानाच प्रत्येक अडचणीत त्यांच्या सोबत राहण्याची ग्वाही, या व्यासपीठावरून दिली. लवकरच नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानावर ज्येष्ठांकरिता एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला जवळपास पाच हजार ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहतील. यात ज्येष्ठ नागरिक आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतील, असेही मंदा म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले. तर ज्येष्ठ नागरिक हा समाजातील अतिशय संवेदनशील घटक आहे. त्यांच्यात इच्छामरणाची बळावत चालली प्रवृत्ती चिंताजनक आहे. देशाचा खरा विकास साधायचा असेल, तर या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: Senior citizen's burden is not the property but the country's wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.