भंगार गोडाऊनमुळे सुरक्षेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:58 AM2018-05-11T06:58:28+5:302018-05-11T06:58:28+5:30

मुंब्रा-पनवेल महामार्गावरील भंगार गोडाऊनमुळे एमआयडीसीसह शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भंगार व्यावसायिकांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. गोडाऊनला आग लागण्याच्या घटनाही वारंवार होत असून त्याचा ताण अग्निशमन यंत्रणेवर पडू लागला आहे.

Security risk due to scratches godown | भंगार गोडाऊनमुळे सुरक्षेला धोका

भंगार गोडाऊनमुळे सुरक्षेला धोका

Next

- वैभव गायकर
पनवेल -  मुंब्रा-पनवेल महामार्गावरील भंगार गोडाऊनमुळे एमआयडीसीसह शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भंगार व्यावसायिकांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. गोडाऊनला आग लागण्याच्या घटनाही वारंवार होत असून त्याचा ताण अग्निशमन यंत्रणेवर पडू लागला आहे. भंगार साम्राज्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नसून अशीच स्थिती राहिली तर भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महामार्गावर खुटारी, धानसर, किरवली, रोहिंजन, धारणा ते शिळफाट्यापर्यंत शेकडो भंगार गोडाऊन आहेत. याशिवाय पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल परिसरातही गोडावून आहेत. या गोदामात कपडे, टायर्स, इंधन, ज्वलनशील पदार्थ, प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियमच्या वस्तूंचा साठा केला जातो. ५०० पेक्षा जास्त भंगार गोडाऊन असून अनेकांकडे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते परवानेच नाहीत. परवाना नसताना व गोडाऊनच्या बांधकामाविषयीच्या परवान्या नसताना तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्था ते दीड वर्षापूर्वी स्थापन झालेली महानगरपालिका संंबंधितांवर काहीही कारवाई करत नाही. अनेक गोडाऊनमध्ये रासायनिक पदार्थांचे साठे केले जातात. ज्वलनशील वस्तूंचा साठा करताना सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत. ज्वलनशील पदार्थ उघड्यावर उन्हात ठेवले जातात. यामुळे अनेक वेळा स्फोट होवून आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. एक ते पाच एकरच्या भूखंडावर गोडाऊन सुरू केली आहेत. परंतु त्यांच्या सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. आग लागल्यास ती विझविण्यासाठी काहीही सुविधा नाही. मागील काही वर्षांमध्ये गोडाऊनला आग लागण्याच्या घटना वाढत आहत. आग लागली की तळोजा, कळंबोली, नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाला तारेवरची कसरत करून आग नियंत्रणामध्ये आणावी लागत आहे.
मुंब्रा-पनवेल महामार्गासर तळोजा परिसरातील भंगार गोडाऊनमुळे औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. याठिकाणी केमिकलचे ड्रम व इतर स्फोटक वस्तूही असतात. त्यांचा स्फोट होवून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. शेकापचे नगरसेवक हरेश केणी यांनी यापूर्वीच महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. अनेक गोडाऊनमध्ये अनधिकृतपणे भंगार व्यवसाय सुरू आहे. पण त्यांच्या तक्रारीकडेही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मुळात भंगार व्यवसाय सुरू करून त्यावर नियंत्रणासाठी शासनाचे ठोस धोरणच नाही. भंगार व्यापारावर नियंत्रण ठेवणारी ठोस यंत्रणा निर्माण केली पाहिजे, अन्यथा भविष्यात भंगार गोडाऊनमध्ये ज्वलनशील वस्तूंचा स्फोट होवून जीवित व वित्त हानीची शक्यता आहे.

गोडाऊनची नोंद नाही
मुंब्रा-पनवेल महामार्गासह नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये हजारो भंगार गोडाऊन व छोटी दुकाने आहेत. या दुकानांमधून रोज करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. पण नक्की किती भंगार गोडाऊन आहेत, त्यांना परवानगी कोणी दिली याची कोणतीच नोंद दोन्ही महापालिका व ठाण्यासह रायगड जिल्हा प्रशासनाकडे नाही. या परिसरातील एक प्रमुख व्यवसायावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शासनाचे धोरण हवे
भंगार व्यवसायातून प्रचंड उलाढाल होत आहे. प्रमुख उद्योगांमध्येही याचा समावेश होवू शकतो. पण भंगार व्यवसायाला परवानगी देण्यापासून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही ठोस धोरण नाही. धोरण असले तरी त्याची माहितीच कोणाला नाही. भंगार व्यवसायामध्ये काम करणाऱ्यांचीही कुठेच नोंद नसते. यामुळे अधिकृत व्यवसाय कोण करतो व अनधिकृत कोण हे ठरविता येत नाही. शासनाने ठोस धोरण तयार केले नाही तर भविष्यात अनधिकृत अनियंत्रित गोडाऊनमध्ये दुर्घटना होवून प्रचंड हानी होवू शकते.

पालिका हद्दीतील सर्वच गोदामांची माहिती घेतली जाणार आहे. अनधिकृत गोदामांवर निश्चितच कारवाई केली जाईल. तसेच ज्या गोदामांमध्ये फायर यंत्रणा उपलब्ध नाही अशा या गोदामांमध्ये फायर यंत्रणा बसविण्याकरिता तत्काळ निर्देश दिले जातील.
- गणेश देशमुख,
आयुक्त,
पनवेल महापालिका
वारंवार लागणाºया आगीच्या घटनांना गोदाम मालकांचा निष्काळजीपणाचा कारणीभूत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गोदामामध्ये अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे आहे.
- अनिल जाधव,
अग्निशमन अधिकारी,
पनवेल महापालिका
या गोदामांमध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवल्या जातात याची माहिती घेतली जाईल. आक्षेपार्ह आढळल्यास त्याच्यावर नक्कीच कारवाई जाईल. तसेच अनधिकृत गोदामे हटविण्याकरिता संबंधित यंत्रणेला नक्कीच पोलीस बळ पुरविले जाईल.
- राजेंद्र माने,
पोलीस उपायुक्त,
परिमंडळ २,
नवी मुंबई

२९ डिसेंबर २०१५
नावडे येथील एक गोडाऊनला आग लागली. आगीचे स्वरूप भीषण असल्यामुळे तीन ते चार तास महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली होती. नवी मुंबई, तळोजा, कळंबोलीमधील अग्निशमन यंत्रणेच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली.

२६ नोव्हेंबर २०१७
धारणा कॅम्प येथील वेअर हाऊस व टायरच्या गोडाऊनला आग लागली. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले व शेजारील कंपन्यांनाही त्याची झळ बसली.

ंमार्च २०१८
धारणा कॅम्पमधील तीन भंगार गोडाऊनला आग लागली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली होती.

Web Title: Security risk due to scratches godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.