बंद कारखान्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; इमारती बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:44 AM2019-07-23T00:44:21+5:302019-07-23T00:44:55+5:30

अवैध व्यवसायाला चालना, एमआयडीसीसह महापालिकेचेही दुर्लक्ष

Security concerns due to closed factories; | बंद कारखान्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; इमारती बनल्या धोकादायक

बंद कारखान्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; इमारती बनल्या धोकादायक

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यांमुळे अवैध व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. खंडरात रूपांतर झालेल्या इमारतींमध्ये मद्यपी व अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. मद्य तस्करी करणारे, भंगार विक्रेते व गुन्हेगारांनी या इमारतींमध्ये आश्रय घेतल्याचे उघड झाले असून, बंद कारखान्यांमुळे या परिसरातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ लागला आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये बोनसरीमधील बंद कंपनीमध्ये १३ जुलैला तिहेरी हत्याकांड झाले. याठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेल्या भंगार गोडावूनमध्ये ही घटना घडली. याच परिसरातील १० जुलैला भूखंड क्रमांक डी ८५ व ८६ वरील बंद कंपनीमध्ये १ कोटी १४ लाख रुपयांचा मद्यसाठा आढळला. सुरक्षारक्षकाच्या मदतीने कंपनीत साठा करण्यात आला होता. तुर्भे एमआयडीसीमध्ये २४ मार्चला साईनाथ ग्रेनाईड या कंपनीमध्ये गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल ७३ लाख रुपयांचा मद्यसाठा हस्तगत केला. पाच महिन्यामध्ये तीन गंभीर गुन्हे घडल्यामुळे बंद कारखान्यांमधील अवैध व्यवसायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिघा ते बेलापूर दरम्यानच्या बंद कारखान्यांची व त्यामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहितीही पोलीस, एमआयडीसी व महापालिका प्रशासनालाही नाही. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या जवळच कांचन इलेक्ट्रिकल कंपनी आहे. १९८३ मध्ये सुरू झालेली कंपनी काही वर्षांपूर्वी बंद झाली आहे. या कंपनीच्या सुरक्षेसाठी काहीही यंत्रणा उपलब्ध नाही. याठिकाणी अमली पदार्थ ओढणारे तरुण दिवसरात्र बसलेले असतात. सोमवारी याठिकाणी जावून पाहणी केली असता एक तरुण अमली पदार्थ ओढत असताना आढळून आला. कंपनीच्या बाहेर पदपथावर भंगार साहित्य ठेवण्यात आले असून भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

इंदिरानगर गणपतीपाडाकडे जाणाºया रोडवर दूध डेरीच्या समोर डी ५२ भूखंडावरील कंपनीही बंद झाली आहे. इमारतीचे बांधकाम अतिधोकादायक स्थितीमध्ये असून तेथे मसाल्याच्या पदार्थांचे पॅकिंग करण्याचा व्यवसाय सुरू आहे. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. बीमलाही तडे गेले आहेत. बोनसरीमधील तिहेरी हत्याकांड झालेल्या कारखान्यामधील भंगार गोडावून बंद करण्यात आले असले तरी अद्याप तेथील सर्व भंगार साहित्य उचलण्यात आलेले नाही. याच परिसरामध्ये डी ५/२ भूखंडावर अग्रवाल ग्रुपने गॅरेज सुरू केले आहे. परंतु कारखान्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साठले असून स्वच्छता ठेवली जात नसल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये फक्त नावापुरतेच सुरक्षारक्षक ठेवले आहेत. अनेक सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळून आले. काही सुरक्षारक्षकांना कंपनीचे नाव, भूखंड क्रमांक व मालकाचे नावही माहिती नाही. बंद कारखान्यांविषयी ठोस भूमिका घेतली नाही तर भविष्यात पुन्हा गंभीर घटना घडल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमली पदार्थ ओढणाऱ्यांची दहशत
इंदिरानगरमधील एव्हरेस्ट इलेक्ट्रिकल कंपनी बंद असून तेथे सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. पण बंद इमारतीमध्ये व समोरील भूखंडावर अमली पदार्थ ओढणारे तरुण बसलेले असतात. त्यांची दहशत असून सुरक्षारक्षकालाही जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृतपणे गोडाऊन सुरू
अनेक बंद कारखान्यांमध्ये अवैधपणे गोडाऊन सुरू आहे. काही ठिकाणी मसाल्याचे पदार्थ ठेवले आहेत. काही कारखान्यांमध्ये भंगाराची दुकाने सुरू केली आहेत. एमआयडीसी प्रशासनाची परवानगी न घेता हे सर्व व्यवसाय सुरू असून त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
धोकादायक इमारतींची यादी नाही

महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यांच्या वास्तूही धोकादायक असून त्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. यामुळे अनेकांनी धोकादायक बंद कंपन्यांचा गोडावूनमधून वापर सुरू केला असून त्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Security concerns due to closed factories;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.