पनवेल : चिंचपाडा गावाजवळील तलावपाळी या ग्रामस्थांनी गुरुवारी विमानतळाच्या भरावाचे काम बंद केले.आमच्या तलावपाळीच्या ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. भरावाचे काम बंद केल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरू करून त्यांना अटक केली.
विमानतळाच्या कामकाजाला जोरात सुरुवात झाली आहे. विमानतळासाठी पनवेल तालुका परिसरातील १० गावांचे पुनर्वसन याच ठिकाणी सिडकोने तयार केलेल्या पुष्पकनगर येथे केले जाणार आहे. सिडको हस्तांतरण करून विमानतळाच्या कामाला सुरुवात केली आहे. हस्तांतरणाबरोबर जवळपास ९० टक्के पुनर्वसनाची कामे सिडकोने केल्याचा दावा केला आहे. तर उर्वरित कामे तीन महिन्यांत करून १०० टक्के पुनर्वसन करण्याचे आश्वासन सिडकोने दिले आहे. मात्र, पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि चिंचपाडा गावाच्या शेजारी असलेल्या तलावपाळी ग्रामस्थांना या विमानतळाचा योग्य तो मोबदला न दिल्याने येथील ३० ते ४० ग्रामस्थांनी तलावपाळी परिसरात सुरू असलेल्या विमानतळाच्या भरावाचे कामकाज बंद पाडले. इतर प्रकल्पबाधितांसारखा आम्हाला देखील मोबदला सिडकोने द्यावा आणि नंतर कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करत प्रकल्पाचे काम बंद पाडले.
सिडकोसोबत वारंवार पत्रव्यवहार आणि गाठीभेटी घेऊनदेखील तलावपाळी परिसरातील ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला न मिळाल्याचा राग मनात धरत. आपल्या घराला आणि शेती तसेच जागेला मोबदला देण्याची मागणी केली. या वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या सिडको अधिकाºयांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाला जुमानता ग्रामस्थांनी ही कामे बंद ठेवत आपला विरोध दर्शविला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकºयांची समज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.