Realistic resolution of Panvel's development | पनवेलच्या विकासाचा वास्तववादी संकल्प
पनवेलच्या विकासाचा वास्तववादी संकल्प

- वैभव गायकर
पनवेल  - पनवेल महापालिकेचा वास्तववादी अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. अशक्यप्राय अशा भव्य प्रकल्पांच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. शहर स्वच्छतेला व पायाभूत सुविधेवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये व सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक काय भूमिका घेणार व त्यामध्ये अजून किती वाढ केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर हा दुसरा अर्थसंकल्प. गतवर्षी निवडणुका असल्याने पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक प्रशासनाने तयार केले होते व नंतर त्याला सुधारित मान्यता घेण्यात आली होती. २०१८ - १९ वर्षासाठीचा अर्थसंकल्प खºया अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे. आयुक्त कोणत्या योजनांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आयुक्तांनी खर्चीक प्रकल्पांपेक्षा पायाभूत सुविधांवर लक्ष दिले आहे. आरोग्य सुविधेची पायाभरणी करून नागरिकांना लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देणे. घनकचरा व्यवस्थापन, साथीचे आजार, लसीकरण, श्वान व मूषक नियंत्रणा या सारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठीही तरतूद केली आहे. पनवेल हे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर होवू शकते. शहरात झोपड्यांची संख्या कमी आहे. ती पुन्हा वाढू नये यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठीही तरतूद केली आहे. पाणी ही शहरवासीयांसमोरील सर्वात गंभीर समस्या असणार आहे. यामुळे नवीन जलकुंभ बांधणे, पाणी विकत घेणे, धरणाची उंची वाढविणे यासाठीही मोठी तरतूद केली आहे. प्राथमिक शिक्षण मोफत व चांगल्या दर्जाचे देण्यावर भर देण्यात येणार आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यात येणार आहे. ई लर्निंगसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये गावठाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी तरतूद केली असून गावठाणांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठीही विशेष तरतूद केली आहे. पूर्ण शहरात एलईडी पथदिवे बसविणे, सर्व प्रमुख बाजूला प्रवेशद्वारांची निर्मिती करण्यावरही लक्ष दिले आहे. आयुक्तांनी अर्थसंकल्प वास्तववादी असल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेसमोर खरे आव्हान प्रशासकीय यंत्रणा सक्षम करणे हेच असणार आहे. आरोग्य, शिक्षण, उद्यान, अभियांत्रिकी, परिवहन व इतर सर्व विभाग सक्षमपणे सुरू करण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. प्रत्येक नोडमध्ये सर्व सुविधांनी युक्त विभाग कार्यालय, नागरी आरोग्य केंद्र, प्रत्येक प्रभागात शाळांसाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

गावठाण विकासावर भर
अर्थसंकल्पामध्ये गावठाण विकासासाठी स्वतंत्र तरतूद केली आहे. गावठाण परिसरातील पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करून, एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन कोटी रुपये, गावठाण परिसरातील पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी २४ कोटी रुपये इतर खर्चासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गावठाणांचे सर्वेक्षण केल्यामुळे विकासाच्या नक्की कोणत्या योजना राबविणे आवश्यक आहे, याविषयी नियोजन करणे शक्य होणार आहे.
एलईडी दिव्यांनी उजळणार रस्ते
शहरातील दिवाबत्तीच्या सुविधेसाठी तब्बल १५ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोडवर एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. यासाठी पाच कोटी खर्च होणार आहेत. सोलार यंत्रणा बसविणे, हायमास्ट बसविणे, नवीन दिवे बसविणे, रोडवर नवीन खांब, भूमिगत सर्व्हिस लाइन टाकण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पाणीपुरवठ्यासाठी २८ कोटी
अर्थसंकल्पामध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल २८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देहरंग धरणाची उंची वाढविणे, नवीन जलकुंभ उभारणे, देहरंग धरण परिसरामध्ये रेस्ट हाउसची उभारणी करणे, गाढेश्वर धरण पुरामुळे वाहून गेलेले पाइपलाइन टाकणे, धरण परिसराचे सुशोभीकरण करणे, आप्पासाहेब वेदक जलाशयातील गाळ काढणे, नवीन पाइपलाइनच्या व इतर कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
मालमत्ता कर मुख्य स्रोत
महापालिकेने ५१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतामध्ये मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत असणार आहे. १०० कोटी रुपये या माध्यमातून मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वास्तविक मालमत्तांचे सर्वेक्षण केले व सर्व मालमत्ता सर्वेक्षणाच्या कक्षेत आणल्या तर मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न अजून वाढणार आहे.

शहर विकासाची महत्त्वाची
कामे व तरतूद (लाख)
कामे तरतूद
रोडचे काँक्रीटीकरण ५००
रोडचे डांबरीकरण ५००
नवीन रस्त ५००
स्मशानभूमी ५००
तलाव व सुशोभीकरण ५००
कृष्णाळे व देवाळे तलाव २००
पेव्हर ब्लॉक १००
नवीन प्रशासकीय इमारत ५००
विकास आराखडा व स्मार्ट सिटी ५५००
बहुउद्देशीय सभागृह, समाज मंदिर १००
वाहनतळ विकसित करणे १००
रात्र निवारा केंद्र उभारणे ५०
आंबेडकर भवन १०
प्राथमिक शाळा इमारत २००
नवीन बाजार विकसित करणे १००
प्रवेशद्वार उभारणे २००
१३ व १४व्या वित्त आयोगातून होणारी कामे (लाख)
कामाचे स्वरूप खर्च
नाट्यगृह बांधणे ५०
दलित वस्ती सुधारणा २००
देहरंग धरण उंची वाढविणे ०१
अग्निशमन अभियानांतर्गत केंद्र ०१
अमृत योजना ४७००

विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग
शिक्षण व क्रीडा विभागासाठी नऊ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पालिका शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना ई-लर्निंग व संगणक शिक्षण देण्यासाठीही २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहा लाख रुपयांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधा देण्यात येणार आहेत. क्रीडा व सांस्कृती विभागासाठी तब्बल चार कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे.

सर्वांसाठी घर योजना
पनवेल हे राज्यातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर होऊ शकते. इतर शहरांच्या तुलनेमध्ये झोपडपट्टीची संख्या कमी आहे. शहरामध्ये सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एक कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील तरतूद कमी असली तरी यासाठी तरतूद केल्यामुळे ही योजना राबविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे शक्य होणार आहे.

वृक्षगणना करणार
अर्थसंकल्पामध्ये वृक्ष संवर्धनासाठी एक कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पालिका क्षेत्रातील वृक्षगणना करण्यासाठी २५ लाख रुपये, अनावश्यक वृक्ष छाटणीसाठी ५० लाख, उद्यान दुरुस्तीसाठी २५ लाख वृक्ष संवर्धन व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पर्यावरण रक्षणावरही भर दिला असून, त्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

कुष्ठरुग्णांचीही घेतली काळजी
समाज विकास योजनांसाठी तीन कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील कुष्ठरुग्णांचीही दखल घेतली असून, त्यासाठीही दोन लाखांची तरतूद केली आहे. दिव्यांग मुलांसाठी केंद्र सुरू करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


Web Title:  Realistic resolution of Panvel's development
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.