राज्यात ७०,३२५ कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 04:20 AM2018-02-19T04:20:15+5:302018-02-19T04:20:38+5:30

महाराष्ट्रात ७० हजार ३२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव जगभरातील उद्योजकांनी दिले आहे. ५ लाख कोटी अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पंक्तीत जाण्याची क्षमता भारतामध्ये असून...

Proposal for an investment of Rs 70,325 crore in the state | राज्यात ७०,३२५ कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

राज्यात ७०,३२५ कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

Next

मुंबई : महाराष्ट्रात ७० हजार ३२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव जगभरातील उद्योजकांनी दिले आहे. ५ लाख कोटी अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पंक्तीत जाण्याची क्षमता भारतामध्ये असून, त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा १ लाख कोटी डॉलरचा निश्चितपणे असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या वतीने आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, रामदास आठवले, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानींसह देशविदेशातील प्रख्यात उद्योगपती मंचावर उपस्थित होते.

रिलायन्स: ६० हजार कोटींची गुंतवणूक - 
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, ब्लॉकचेन या आधारे डिजिटल क्रांती घडवून आणण्यास रिलायन्स पहिले डिजिटल इंटीग्रेटेड इंडस्ट्रिअल क्षेत्र महाराष्ट्रात उभे करणार आहे. सिस्को, डेल, एचपी, नोकिया यासारख्या २० कंपन्या भागीदारी करण्यास तयार आहेत. ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे केली जाईल, अशी घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली. भारतात १३ लाख रोजगार उभारण्यास कटिबद्ध असू, असे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अव्वल साब या स्वीडीश कंपनीचे जॅन विंडरस्टॉर्म म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणपुरक ई-वाहनांची लक्ष्य निश्चित केले आहे. केंद्रानंतर महाराष्ट्राने या संबंधीचे पहिले धोरण तयार केले. यामुळेच महिंद्रा कंपनी ५०० कोटी रुपयांचा ई-वाहन कारखाना उभा करेल, अशी घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली. यासंबंधी नागपुरात १२५ कोटी रुपये खर्चून सेंटर आॅफ एक्सलन्स उभे केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे-मुंबई २० मिनिटांत! - 
पुणे ते मुंबई आणि मुंबई ते नवीमुंबई हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत शक्य करू शकणारी हायपरलूप ट्रेन सुरू करत आहोत. देशातील प्रमुख शहरांना २ तासांत जोडणारी आणि दरवर्षी १५ कोटी प्रवाशांना ने-आण करण्याची क्षमता असलेली ट्रेन सुरू करण्यास आम्ही कटिबद्ध आहे, अशी ग्वाही व्हर्जिन हायपरलूपचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन यांनी दिली.

हायब्रीड, ई-वाहनांच्या सुट्या भागाचे उत्पादन - 
संरक्षण क्षेत्र सामग्री उत्पादनात कार्यरत असलेल्या भारत फोर्जचे बाबा कल्याणी यांनी खेड येथे हायब्रीड व ई-वाहनांच्या सुट्या भागांचे २ कारखाने सुरू करण्याची घोषणा केली. भारताची सध्या असलेली १.३० लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था ५ लाख डॉलरपर्यंत नेताना, महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत, असे इमर्सनचे एडवर्ड मॉन्सन म्हणाले. भारत व महाराष्ट्राच्या वेगवान प्रवासात सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे मत कोरियन ह्युसंग कंपनीचे ह्यु जून चो यांनी व्यक्त केले.

पोस्को उभारणार पोलाद कारखाना - 
महाराष्ट्रात ८ हजार कोटी रुपयांचा पोलाद कारखान्यासाठी सामंजस्य करार करीत असल्याची घोषणा पोस्को इंडियाचे गील हो बांग यांनी केली. त्यातून २ हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. महिंद्रा उद्योग समूह कांदिवलीत १,७०० कोटी रुपयांची विशेष सुविधा उभी करणार आहे.

Web Title: Proposal for an investment of Rs 70,325 crore in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.