इंग्रजी माध्यमाला प्राधान्य :मराठी शाळांचा अस्तित्वाचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:25 AM2018-02-27T02:25:18+5:302018-02-27T02:25:18+5:30

मुलांना स्पर्धेच्या युगात टिकविण्यासाठी हल्ली इंग्रजीला प्राधान्य दिले जात असल्याने मराठी शाळा हद्दपार होत चालल्या आहेत. इंग्रजी भाषा ही रोजगाराभिमुख झाल्याने मराठी भाषिकांकडून देखील मराठीतून शिक्षणाला नाक मुरडले जात आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांपुढे अस्तित्वाचा लढा निर्माण झाला आहे.

 Priority in English medium: The fight for the existence of Marathi schools | इंग्रजी माध्यमाला प्राधान्य :मराठी शाळांचा अस्तित्वाचा लढा

इंग्रजी माध्यमाला प्राधान्य :मराठी शाळांचा अस्तित्वाचा लढा

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : मुलांना स्पर्धेच्या युगात टिकविण्यासाठी हल्ली इंग्रजीला प्राधान्य दिले जात असल्याने मराठी शाळा हद्दपार होत चालल्या आहेत. इंग्रजी भाषा ही रोजगाराभिमुख झाल्याने मराठी भाषिकांकडून देखील मराठीतून शिक्षणाला नाक मुरडले जात आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांपुढे अस्तित्वाचा लढा निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातूनच लुप्त होत चाललेली मराठी भाषा टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मराठी भाषा व मराठीतले शिक्षण रोजगाराभिमुख नसल्याची अनेकांची धारणा आहे. यामुळे शिक्षणाकरिता मराठीऐवजी इंग्रजीला अधिक प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. पालकांच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भाग वगळता शहरी भागात इंग्रजी शाळांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यात सीबीएससी, आयसीएससी बोर्डाच्या इंग्रजी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे. परिणामी राज्य बोर्डाचेही महत्त्व घटू लागले आहे. हेच चित्र नवी मुंबईतही पाहायला मिळत आहे. २१ व्या शतकातले शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात आयटी हब तयार होत आहे. शिवाय देशभरातील शिक्षण संस्थांनी नवी मुंबईतही त्यांच्या शाखा सुरू केल्या आहेत. यामुळे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया पुण्यापाठोपाठ नवी मुंबईतल्या शाळा, महाविद्यालयांची संख्या वाढत चालली आहे.
स्पर्धेच्या युगात आपले पाल्य टिकावे असाच प्रयत्न प्रत्येक पालकाकडून होत असतो. त्याकरिता इंग्रजीतल्या विशेष करून सीबीएससी व आयसीएससी बोर्डाच्या इंग्रजी शिक्षणाला महत्त्व दिले जाऊ लागले आहे. परिस्थिती नसतानाही वाटेल तेवढे शुल्क मोजून त्याच शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळवण्याची स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे या स्पर्धेत न टिकणाºया घटकांनीच थोडेफार मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. प्राथमिक वर्गापासून मुलगा इंग्रजी शाळेत शिकल्यास त्याच्यापुढे जगभरात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील अशीच पालकांची अपेक्षा असते.
नवी मुंबई हे इतर महत्त्वाच्या शहरांच्या तुलनेत नव्याने तयार झालेले शहर आहे. यापूर्वी इथे मॉडर्न स्कूल, नवी मुंबई हायस्कूल, रा. फ. नाईक विद्यालय, आयसीएल तसेच घणसोलीतील शेतकरी शिक्षण संस्थेचे विद्यालय अशा मोजक्याच शाळा होत्या. या शाळेत शिकून मोठ्या झालेल्या पिढीने देखील त्यांच्या पाल्यांसाठी नव्याने आलेल्या आंतरराष्टÑीय इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहरातील एक पिढी घडवणाºया या शाळांपुढेही अस्तित्व टिकवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेत उतरावे लागले आहे.
महापालिकेने देखील या स्पर्धेत उडी घेत या शैक्षणिक वर्षापासून सीबीएससी बोर्डाच्या दोन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठीतून संमेलने घेतली जातात, परंतु मराठी शाळा टिकविण्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

Web Title:  Priority in English medium: The fight for the existence of Marathi schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.