दिघा धरण हस्तांतराला हवे जाहीरनाम्यात प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:26 PM2019-04-09T23:26:56+5:302019-04-09T23:27:36+5:30

नागरिकांची अपेक्षा : जलसाठ्याचा वापर न होणारे राज्यातील एकमेव धरण

Priority in Declaration of Deewar Dam | दिघा धरण हस्तांतराला हवे जाहीरनाम्यात प्राधान्य

दिघा धरण हस्तांतराला हवे जाहीरनाम्यात प्राधान्य

Next

- नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ब्रिटिशांनी १६० वर्षांपूर्वी बांधलेल्या दिघा धरणातील जलसाठ्याचा सद्यस्थितीमध्ये काहीही उपयोग होत नाही. धरण रेल्वेकडून महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या विषयाला प्राधान्य द्यावे व जे निवडून येतील, त्यांनी पाच वर्षांत हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. मतदार संघामधील प्रश्न सोडविण्याचे व विकासकामे करण्याची आश्वासने दिली जात आहेत. नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षांविषयी मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दिघा धरणाच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्रिटिशांनी दिघामध्ये धरण बांधले. १८.१० एकर जमिनीवर १८५ मीटर लांबीचे व १४.९५ मीटर उंचीचे हे धरण आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची स्थिती आहे. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना अनेक किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. अनेक शहरामध्ये दोन दिवसांनी ते आठवड्यामधून एकदाच पाणीपुरवठा होत आहे; पण दिघा धरणामध्ये पाणीसाठा असताना त्याचा काहीच उपयोग होत नाही. राज्यात छोटी-मोठी १८२१ धरणे असून, त्यामधील जलसाठ्याचा वापर न होणारे दिघा हे एकमेव धरण आहे.


धरणाची मालकी रेल्वेकडे असल्यामुळे महापालिकेला त्याचा वापर करता येत नाही. रेल्वेला सद्यस्थितीमध्ये या पाण्याचा काहीही उपयोग नाही. यामुळे धरण महानगरपालिकेकडे हस्तांतर करावे. महापालिकेने या पाण्याचा वापर दिघा परिसरामधील नागरिकांसाठी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पिण्यासाठी किंवा इतर कामांसाठी हे पाणी वापरता येऊ शकते. याशिवाय धरणाच्या परिसराचा विकास करून पर्यटनस्थळ विकसित करता येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे; परंतु अनेक वर्षांपासून हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागत नाही. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने येथील पाण्याचा वापर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही.

पर्यटनस्थळ होऊ शकते
दिघा धरण परिसरामध्ये उन्हाळा सुरू झाल्यानंतरही पुरेसा जलसाठा आहे. वर्षभर या परिसरामध्ये अनेक शहरवासी भटकंतीसाठी जात असतात. पावसाळी पर्यटनासाठीही या परिसराला पसंती दिली जाते. धरण हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागला तर येथील पाण्याचा वापर होईलच, शिवाय या परिसरामध्ये निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करणे शक्य होणार आहे.
 

दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर झाले, तरच त्यामधील पाण्याचा योग्य वापर करता येणार आहे. हा प्रश्न रेल्वेशी संबंधित असल्यामुळे लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश करावा व पुढील पाच वर्षांत हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
- महादेव मर्ढेकर,
रहिवासी, ऐरोली
पावसाळ्यामध्ये व उन्हाळ्यामध्येही अनेक वेळा आम्ही दिघा धरण परिसरामध्ये भटकंती करण्यासाठी जात असतो. येथील पाण्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून खंत वाटते. या पाण्याचा वापर करता यावा, यासाठी हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागला असून सर्वच उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात स्थान दिले पाहिजे.
- किरण ढेबे, दक्ष नागरिक

Web Title: Priority in Declaration of Deewar Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई