Prior to Satara; Then vote in Navi Mumbai, Manda Mhatre's advice | अगोदर साताऱ्यात; नंतर नवी मुंबईत मतदान करा, मंदा म्हात्रे यांचा सल्ला
अगोदर साताऱ्यात; नंतर नवी मुंबईत मतदान करा, मंदा म्हात्रे यांचा सल्ला

नवी मुंबई : लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. अगोदर २३ एप्रिल रोजी साताºयात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा अजब सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.
कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी रविवारी कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना मंदा म्हात्रे यांचा तोल गेला. मात्र, चूक लक्षात येताच दोन ठिकाणी मतदान करण्याचा सल्ला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिला होता, अशी पुष्टी जोडत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मंदा म्हात्रे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.
>शरद पवारांचा होता सल्ला
२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात बोटाला लावलेली शाई पूसून सातारा आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी मतदान करण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.


Web Title: Prior to Satara; Then vote in Navi Mumbai, Manda Mhatre's advice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.