Pollutionless buses to be run in Navi Mumbai | नवी मुंबईत धावणार प्रदूषणविरहित बसेस

नवी मुंबई : शहरातील वाढती वाहनांची समस्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याकरिता महापालिकेच्या परिवहन उपक्र माने महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार व महापालिकेच्या मंजुरीने यापूर्वी सीएनजी बसेस व हायब्रीड बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक बसेस या बॅटरीवर चालणाºया बसेस असून, एक वेळ बॅटरी पूर्ण चार्जिंग केल्यानंतर त्याव्दारे २०० ते २५० किमी चालण्याची क्षमता आहे. या बसेस पूर्णपणे बॅटरीवर चालणाºया असल्याने व त्यांना कुठल्याही प्रकारचे इंधन लागत नसल्याने वायुप्रदूषण होत नाही, तसेच ध्वनिप्रदूषणालाही आळा बसणार आहे.
पारंपरिक इंधनास पर्याय म्हणून व पर्यावरणाच्या दृष्टीने उपयोगी असल्याने आता इलेक्ट्रिक बसेस वापर करण्याची गरज भासत आहे. केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत ‘फेम’ या नावाने योजना लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस खरेदी व चार्जिंग स्टेशन उभारणीकरिता अनुदान देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत ३० बसेस खरेदी व चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठीचा प्रकल्प अहवाल प्रायोगिक तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी घेतलेला आहे.
इलेक्ट्रिक बसेस खरेदीकरिता अंदाजे प्रति बस २.५० कोटी खर्च अपेक्षित असून, त्यापैकी केंद्र शासनाकडून प्रतिबस १.५० कोटी किंवा बस किमतीच्या ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे आणि उर्वरित अनुदान नवी मुंबई महानगरपालिकेकडून अपेक्षित आहे. या बसेस चार्जिंग करण्याकरिता चार्जिंग स्टेशन उभारण्यासही केंद्र शासन बस खरेदी अनुदान रकमेच्या १० टक्के इतके अनुदान फेम इंडिया योजनेअंतर्गत देणार आहे. प्रस्तावास केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर पुढील आवश्यक मंजुºया, अर्थसंकल्पात तरतूद व निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.