दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार !, महापौर निवडणुकीची चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 07:11 AM2017-10-18T07:11:39+5:302017-10-18T07:12:37+5:30

महापौरपदाची निवडणूक काही दिवसांवर आली असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडून महापौरपद हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न

 Political fireworks will start after Diwali! | दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार !, महापौर निवडणुकीची चुरस

दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार !, महापौर निवडणुकीची चुरस

Next

नामदेव मोरे
नवी मुंबई : महापौरपदाची निवडणूक काही दिवसांवर आली असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडून महापौरपद हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीनेही महापौर आमचाच बसणार असे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, दिवाळी संपताच राजकीय फटाके फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची मुदत आॅक्टोबरमध्ये संपत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून पक्ष कोणताही असला तरी गणेश नाईक यांचेच पालिकेवर वर्चस्व राहिले आहे. गत निवडणुकीमध्ये नवी मुंबईकरांनी स्पष्ट कौल दिला नसला तरी १११ पैकी ५३ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला. राष्ट्रवादीने काँगे्रसचे दहा व पाच अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. अपक्ष नगरसेवक असलेल्या सुधाकर सोनावणे यांना पक्षाचे सदस्यत्व देवून महापौर बनविले व काँगे्रसला उपमहापौरपद दिले. अडीच वर्षामध्ये शिवसेना - भाजपाने राष्ट्रवादी काँगे्रसला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. २०१६ मध्ये काँगे्रसचे एक मत फोडून शिवसेनेने स्थायी समितीचे सभापतीपद मिळवून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. येणाºया महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा राष्ट्रवादीला धक्का देण्याची तयारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. पक्षातील प्रमुख नगरसेवकांची मीटिंग घेवून महापौर आपलाच बसला पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी, काँगे्रस व अपक्ष नगरसेवकांना फोडण्याचे काम सुरू केले असून त्यासाठी एक टीमच तयार केली आहे. राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक संपर्कात असल्याची माहिती सेनेच्या बड्या नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज असलेल्या सर्वांशी संपर्क साधला जात आहे. अनेकांना लक्ष्मीदर्शनाचे आश्वासन देण्यात आले असून काहींना दिवाळीपूर्वीच लक्ष्मीदर्शन घडविल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडायची व अपक्षांसह काँगे्रसच्या मदतीने महापौरपद पदरात पाडण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक स्वत: महापौरपदाच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी सर्व नगरसेवकांची मीटिंग घेवून महापौर आपलाच होणार असा दावा केला आहे. अनेकांना प्रलोभने दाखविली जात आहेत. प्रलोभनांना भुलू नका. क्षणिक फायद्यासाठी स्वत:ला विकू नका, असे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीनेही शिवसेनेसह भाजपाला खिंडार पाडण्याची तयारी केली आहे. विनाकारण फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही, पण विरोधकांनी तसा प्रयत्न केला तर २००७ च्या स्थायी समिती निवडणुकीप्रमाणे भूकंप घडवून आणायची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये फोडाफोडीचे राजकारण होणार हे निश्चित झाले असून अपक्षांसह काँगे्रस नगरसेवकांचे महत्त्व प्रचंड वाढले आहे.

राष्ट्रवादीत नाराजांची फौज
सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये मागील काही दिवसांपासून नाराजांची संख्या वाढू लागली आहे. तुर्भेमधील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी अनेक वेळा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याबरोबर चार नगरसेवक आहेत. दिघा येथील गवते कुटुंबियांचे तीन नगरसेवक असून जो दिघावासीयांना मदत करणार आम्ही त्यांच्यासोबत असल्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. याशिवाय नाईक यांच्या बोनकोडे गावातील मुनावर पटेल, वाशीतील दिव्या गायकवाड व इतर अनेक नगरसेवक नाराज असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले होते. याशिवाय माजी परिवहन सभापती साबू डॅनियल यांनी नुकतीच आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. यापैकी कोणीच पक्ष सोडण्याची भाषा केली नसली तरी नाराजांना शांत करण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे. शिवाय शिवसेनेच्या संपर्कात असणारांना थांबविण्याचे आव्हानही सत्ताधाºयांपुढे आहे.

नाईक की शिंदे?
महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचे ठाणेकरांचे स्वप्न नाईकांनी कधीच यशस्वी होवू दिले नाही. २०१६ च्या स्थायी समितीमध्ये शिंदे यांनी धक्का दिला होता त्याच पद्धतीने महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. नाईक हे कधीच शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे डावपेच समजून देत नाहीत. यामुळे शिंदे जिंकणार की नाईक याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेमध्येही गटबाजी
स्थायी समिती सदस्य निवडीच्यावेळी शिवसेनेमधील गटबाजी उघड झाली होती. भांडणामुळे स्थायी समितीचे सभापतीपद गमवावे लागले होते. महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भांडण होवू नयेत यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत असले तरी शेवटच्या क्षणी सेनेतच गटबाजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौरपदाचा उमेदवार कोण असणार यावरही सेनेत फूट पडणार की नाही हे निश्चित होणार आहे.

Web Title:  Political fireworks will start after Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.