पर्यटकांना खुणावतोय गाढेश्वरचा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:33 AM2018-06-19T02:33:01+5:302018-06-19T02:33:01+5:30

पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे.

Places of Gondeshwar to mark tourists | पर्यटकांना खुणावतोय गाढेश्वरचा परिसर

पर्यटकांना खुणावतोय गाढेश्वरचा परिसर

googlenewsNext

- मयूर तांबडे 
पनवेल : पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगरांच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षित होतात. पहिल्याच पावसात यावर्षी सुध्दा गाढेश्वर धरणाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाढेश्वर (देहरंग) धरणाचा समावेश होतो. पावसाळ्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक धरणावर येत असतात. पनवेलपासून १६ कि.मी. अंतरावर असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. शनिवार आणि रविवार सुटीचा वार म्हटला की हजारोंच्या संख्येने पर्यटक या धरणात मौजमजा करण्यासाठी येतात. पर्यटक या ठिकाणी मद्यप्राशन करून पाण्यात पोहण्यासाठी जातात, तर काही पर्यटक आपल्या कुटुंबासह या परिसरात येत असतात. मद्याच्या नशेत पावसाचा आनंद घेत काही जण खोल असलेल्या पाण्यात जातात. येथील पाण्याचा अंदाज न आल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे व खोल डोह असल्याने ते समजून येत नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव याहीवर्षी गाढेश्वर धरणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आठवड्याच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे पर्यटकांचा ओढा गाढेश्वर धरणाकडे वाढू लागला आहे. असे असले तरी धरणात अद्याप पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे पर्यटकांना रोखण्यासाठी किंबहुना त्यांची समजूत काढण्यासाठी या मार्गावरील वाजे फाट्याजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तालुका पोलिसांनी सूचनांचे फलक परिसरात लावलेले आहेत. परिसरात अमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक पदार्थ बाळगताना अथवा पिताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचना फलकात लिहिलेले आहे. तरी देखील काही मद्यपी रविवारी धरणाच्या परिसरात जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांच्या गाडीसह त्यांना परत पाठविले. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.

Web Title: Places of Gondeshwar to mark tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.