नागरिकांकडून रेल्वेरूळ ओलांडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:23 AM2019-06-12T02:23:33+5:302019-06-12T02:24:00+5:30

तुर्भेतील पादचारी पुलाकडे पाठ : भिंतीचे भगदाड बुजवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

The passengers started crossing the train | नागरिकांकडून रेल्वेरूळ ओलांडणे सुरूच

नागरिकांकडून रेल्वेरूळ ओलांडणे सुरूच

Next

नवी मुंबई : पादचारी पूल असतानाही तुर्भे येथे नागरिकांकडून रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रकार सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीच त्याठिकाणी पालिकेच्या खर्चातून उभारण्यात आलेला पूल पादचाऱ्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. परंतु रेल्वेरुळालगतच्या सुरक्षा भिंतीचे भगदाड बुजवण्याकडे रेल्वे प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीवघेणा शॉर्टकट सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
तुर्भे जनता मार्केट येथे रेल्वेरुळावर पालिकेच्या वतीने पादचारी पूल उभारण्यात आला आहे. त्यासाठी सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पूलासाठी गेली दहा वर्षापासून लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू होता. पुलाच्या उभारणीनंतर त्याठिकाणी रेल्वे अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र पुलाच्या उभारणीनंतरही नागरिकांकडून रेल्वेरुळावरील शॉर्टकट मार्गालाच पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तुर्भे नाका व जनता मार्केट या दोन परिसरातील नागरिकांना दोन्ही भागात ये-जा करता यावी यासाठी हा पूल उपयुक्त ठरणार आहे. मात्र सदर ठिकाणी अनेक वर्षांपासूनचा शॉर्टकटचा मार्ग बंद करण्यात रेल्वेप्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पादचारी पूल उभारणीपूर्वी रूळ ओलांडण्यासाठी जवळचा पर्याय नसल्याने नागरिकांनी रेल्वे रुळाभोवतीची सुरक्षा भिंत पाडून पायवाट तयार केलेली आहे. परंतु पूल उभारल्यानंतर ही पायवाट बंद केली जाणे आवश्यक असतानाही ती बंद करण्यात आलेली नाही. यामुळे पुलावरून चालत जाण्याऐवजी रूळ ओलांडून प्रवास करण्याकडेच काही नागरिकांचा कल दिसून येत आहे. यामध्ये त्यांच्या जीविताला धोका उद्भवत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गाकडील रेल्वेच्या सुरक्षा भिंतीतून आतमध्ये रिक्षा देखील नेल्या जात आहेत. रुळालगतच्या भागात अशा प्रकारे वाहने नेली जात असल्याने भविष्यात रेल्वेच्या दुर्घटनेची देखील शक्यता नाकारता येत नाही. मात्र संपूर्ण प्रकार नजरेसमोर असतानाही रेल्वे प्रशासनाकडून कोणतेच ठोस पाऊल उचलले जात नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याठिकाणी रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्यास तसेच भिंतीचे भगदाड बुजवल्यास पादचाºयांकडून पुलाचा वापर होऊ शकतो. त्याकरिता पुलावर अनधिकृत फेरीवाले ठाण मांडून बसणार नाहीत याचीही खबरदारी घेतली जाणे गरजेचे झाले आहे.
 

Web Title: The passengers started crossing the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.