शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही लागणार पार्किंग शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 03:10 AM2018-07-25T03:10:18+5:302018-07-25T03:10:36+5:30

चारचाकी वाहनांना रात्रीच्या वेळी पार्किंगसाठी २000 रुपयांचा मासिक पास; महापालिकेचा प्रस्ताव

Parking fees for city's housing institutions will also be required | शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही लागणार पार्किंग शुल्क

शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही लागणार पार्किंग शुल्क

Next

नवी मुंबई : आधुनिक शहरातील वाहनतळाचे नियोजन फसल्याने वाहतूक यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत रस्त्यांवरही दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांच्या समोरील रस्त्यावर वाहने उभी केली जातात. परंतु रस्त्यावर वाहने पार्क करणाऱ्या गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनाही आता पार्किंग शुल्क भरावे लागणार आहे. तशा आशयाचा प्रस्ताव महापालिकेने आणला आहे.
नवी मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २0११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ११ लाख इतकी नोेंदविण्यात आली आहे. परंतु लोकसंख्येचा वाढता आलेख पाहता २0३0 पर्यंत शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. परंतु त्या तुलनेत वाहनतळाची उपलब्ध सुविधा अपुरी पडू लागल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाटेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणाºया बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडत आहे. विशेष म्हणजे प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत अरुंद रस्त्यांवर सुद्धा दुतर्फा वाहने उभी केली जातात.
गृहनिर्माण संस्थांनी आपली वाहने सोसायटीच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्येच उभी करणे बंधनकारक आहे. परंतु सोसायटीतील जागाही अपुरी पडू लागल्याने वाहनधारक सर्रासपणे रस्त्यावर वाहने उभी करू लागले आहेत. त्याचा फटका अंतर्गत वाहतुकीला बसला आहे. सोसायटीसमोरील रस्त्यावरील वाहन पार्किंगला आळा घालण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. काही भागात सम-विषम पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे अशा बेशिस्त वाहन पार्किंगला आळा घालण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंबर कसली आहे.
गृहनिर्माण सोसायटीसमोरील रस्त्यावर वाहने पार्क करण्यासाठी आता संबंधित वाहनधारकाला शुल्क भरावे लागणार आहे. शहरातील पे अ‍ॅण्ड पार्किंग शुल्क आकारणीत सुधारणा करण्याबरोबरच सोसायट्यासमोरील रस्त्यावर रात्रीच्या वेळी पार्क केल्या जाणाºया वाहनांसाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी मासिक पासची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार दुचाकीसाठी ५00 तर चारचाकी वाहनांसाठी २000 रुपयांचे मासिक शुल्क भरावे लागणार आहे. तसेच वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर रात्रीच्या वेळी पार्क केले जाणारे ट्रक व खासगी बसेससाठी महिन्याला ६000 रुपये अदा करावे लागणार आहेत. ही शुल्क आकारणी रात्री १0 ते सकाळी ८ या दहा तासांसाठी असणार आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंगला आळा बसण्याबरोबरच त्यातून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

> महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील रस्त्यांवर सध्या ३,५१,६२0 वाहने पार्क केली जातात. यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत पार्किंगच्या सुविधा अपुºया पडू लागल्याने पे अ‍ॅण्ड पार्किंगच्या माध्यमातून शहरातील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याच्या दृष्टीने महापालिकेने सकारात्मक पावले उचलली आहेत.

Web Title: Parking fees for city's housing institutions will also be required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.